पुणे -छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती. त्यानिमित्ताने अनेकांनी सोशल मीडियावर अभिवादन केले आहे. त्यात कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी अभिवादनच्या ऐवजी श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावरून त्यांच्यावर टीका केली जात आहे. शिवजयंती दिनी ‘श्रद्धांजली’ असा उल्लेख केल्याने टीका केली जात आहे. यावर छत्रपती संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
छत्रपती संभाजीराजे म्हणाले, जयंतीच्या दिवशी कोणी श्रद्धांजली अर्पण करते का?’ जयंती हा साजरा करण्याचा, प्रेरणा घेण्याचा दिवस असतो. त्यामुळे अशा वेळी ‘श्रद्धांजली’ हा शब्दप्रयोग चुकीचा असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले आहे. शिवजयंती ही महाराजांच्या विचारांची पुनर्स्मृती करण्याची संधी असते, श्रद्धांजली नव्हे. त्यामुळे सार्वजनिक नेत्यांनी भाषेची आणि परंपरांची योग्य जाण ठेवून विचारपूर्वक शब्दप्रयोग करावा, असेही छत्रपती संभाजीराजे म्हणाले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. एकनाथ शिंदे म्हणाले, एकनाथ शिंदे म्हणाले, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा ते वारंवार अपमान करत आले आहेत. आता त्यांची मजल छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापर्यंत पोहोचली आहे. हे तमाम शिवभक्तांचा अपमान आहे. हे चुकून झालेले नाही. हे त्यांची जीभ घसरलेली नाही, तर हे त्यांनी जाणीवपूर्वक केलेले विधान आहे. त्यांनी केलेल्या या विधानावर त्यांनी माफी मागायला पाहिजे.
दरम्यान, यावर कॉंग्रेसकडून सारवासारव केली जात आहे. राहुल गांधींनी केलेल्या ट्वीटमुळे वाद उफळला असता, काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ते म्हणाले, राहुल गांधींनी शिवाजी महाराजांना अभिवादन करत असताना काय म्हटले, तर माय हंबल ट्रिब्युट. म्हणजे मी त्यांना अभिवादन करतो, नमन करतो हा त्यांचा त्या मागचा भाव आहे. आता ‘ध’ चा ‘मा’ करून विनाकारण घाणरेडे राजकारण विरोधकांनी करू नये, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिले.