पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या दारुड्यांना अटक करण्यात आली आहे..
पुणे-कोम्बिंग ऑपरेशन करून घरी परतत असताना सेनापती बापट मार्गावरील रत्ना रुग्णालयाच्या परिसरात चार बेवड्यांनी एका पोलिसाला बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे.पोलिस कर्मचारी चंद्रकांत जाधव यांना चौघांनी मारहाण केल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. चंद्रकांत जाधव हे गुरुवारी दिनांक 13 रोजी मध्यरात्री आपल्या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कोम्बिंग ऑपरेशन संपवून घरी परत निघाले होते. रत्ना हॉस्पिटलच्या परिसरात आले असता, चौघेजण त्यांना रस्त्यावर एका रिक्षात मद्यप्राशन करत गोंधळ घालत होते. जाधव यांनी त्यांना हटकले आणि त्याचा त्यांना राग आला. त्यांनी जाधव यांना धमकावत आम्हाला माहिती आहे तू पोलिस आहेस, परंतू तू इथला पोलिस नाहीस, त्यामुळे तु आम्हाला शिकवू नको, असे म्हणत चौघांनी जाधव यांना रिक्षात डांबून बेदम मारहाण करण्यास सुरूवात केली.
आरोपींनी तो दगड उचल आणि ठार मारून टाक त्या पोलिसाला असे म्हणत डोक्यात दगडाने मारहाण केली. आपली सुटका जाधव यांनी केली आणि मोबाईलमध्ये आरोपींचे फोटो काढले. मात्र आरोपींनी त्यांचा मोबाईलही हिसकावला. गंभीर प्रकार म्हणजे जाधव हे पोलिस असल्याची माहिती असताना देखील निर्ढावलेल्या गुन्हेगारांप्रमाने चौघांनी त्यांना मारहाण केली. हा प्रकार घडल्यानंतर जाधव यांनी ओळखीच्या चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यातील एका अधिकार्याला फोन करून आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले. ते सांगत असताना, सर्व प्रकार समोरील अधिकार्यांना ऐकू जात होता. तरी चौघे जाधव यांना मारहाण करत होते.जखमी झालेल्या चंद्रकांत जाधव यांनी हा प्रकार चतुःशृंगी पोलिस ठाण्यात सांगितला व तक्रार दाखल करून घेण्यास सांगितले. मात्र येथील पोलिस कर्मचाऱ्यांनी आता नको उद्या पाहू असे म्हणत वेळ मारून घेतला. तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली असता त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले.दुसऱ्या दिवशी परत जाधव चतुश्रृंगी पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी तेथील अधिकार्यांना भेटून कैफियत मांडली. कोर्टाचे काम असल्याचे सांगून हे अधिकारी निघून गेले. जाधव तेथेच ताटकळत उभे होते. शेवटी वरिष्ठ पोलिस अधिकार्यांना त्यांना भेटवण्यात आले, त्यांनी आपल्या वरिष्ठांच्या कानावर घातले. आरोपींना पकडून तुमच्यासमोर उभे करतो असे म्हणून त्यांची बोळवण करण्यात आली. त्यानंतर तर पोलिसांची हद्दच झाली. त्यांनी आपल्या वजनदार माणसाचा वापर करत मारहाण झालेल्या जाधव यांना प्रकरण मिटवून घेण्याचा अजब सल्लाच दिला.
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर हा प्रकार जाताच, चतुःश्रृंगी पोलिसांनी तीन दिवसानंतर गुन्हा दाखल केला असून मारहाण करणाऱ्या दारुड्यांना अटक करण्यात आली आहे.. रुपेश मांजरेकर (वय २५), अनिकेत राजेश चव्हाण (वय २१), अनिकेत घोडके (वय २४ ), अभि डोंगरे (वय २४, सर्व रा. रामोशीवाडी, वडारवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.