मुंबई- लोकसभेतील विरोधपक्ष नेते राहुल गांधी जयंतीदिवशी ट्विटर अर्थात X वरून शिवरायांना श्रद्धांजली वाहिल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकरणाचे भांडवल करत भाजपने टीकेची झोड उठविली आहे आणि नव्याच वादाला तोंड फुटले आहे. राहुल गांधी यांच्याकडून महापुरुषांचा सतत अपमान सुरू असल्याचा आरोप करत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने, राहुल यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रासह देशभरात आज शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. शिवप्रेमींपासून राजकारण्यापर्यंत सर्वच स्तरातील लोकांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात राहुल गांधी यांनीही शुभेच्छा दिल्या. मात्र शिवजयंतीनिमित्ताने छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याऐवजी राहुल गांधी यांनी श्रद्धांजली या शब्दाचा उल्लेख केला आहे.
राहुल गांधी यांनी छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणतात की, शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आपल्या धैर्याने आणि शौर्याने त्यांनी आम्हाला निर्भयतेने आणि पूर्ण समर्पणाने आवाज उठवण्याची प्रेरणा दिली. त्यांचे जीवन आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहील.भाजपकडून माफीची मागणी…
महाराष्ट्रातील लोकांचा, महापुरुषांचा राहुल गांधी यांच्याकडून सतत अपमान केला जात असतो. जयंतीच्या दिवशी आदरांजली वाहतात. परंतु राहुल गांधी महाराष्ट्रातील महापुरुषांच्या विषयी कळत नकळत अनादार व्यक्त करतात. त्यातील हा गंभीर प्रकार आहे. त्यांनी हे ट्विट मागे घ्यावे, अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा भाजप नेते अतुल भातखळकर यांनी दिला आहे.
औरंग्याच्या पिलावळाकडून अजून दुसरी काय अपेक्षा नाही. हे हिरवे साप आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा जगभरात एक वर्ग आहे. त्या राजाच्या जयंतीच्या निमित्ताने तुम्ही श्रद्धांजलीचा उल्लख करता! राहुल गांधींनी देशाची, जनतेची आणि शिवप्रेमींची माफी मागितली पाहिजे. शिवरायांच्या पुतळ्यासमोर येऊन नतमस्तक व्हावे. राहुल गांधींनी महाराजांची माफी मागितली नाही, तर त्यांना फिरू देणार नाही, असा इशारा मंत्री नीतेश राणे यांनी दिला आहे.