श्री गजानन मंडळातर्फे भव्य शिवजन्मोत्सव सोहळा : श्रीरंग कला दर्पण फाउंडेशन च्या सहयोगाने भव्य रांगोळी प्रदर्शन
पुणे : राजमाता जिजाऊंचे तुळजाभवानी मातेला साकडे… शिवबांचा जन्म… शिवरायांचे पहिले सूर्यदर्शन… शिवरायांचे शस्त्र शिक्षण… अफजल खान वध… बाजीप्रभूंचे शौर्य… भक्ती शक्ती संगम अशा विविध रंगावलीतून कलाकारांनी अतिशय सुंदर आणि प्रभावी शिवचरित्र साकारले. पुण्यात पहिल्यांदाच रंगावलीतून शिवचरित्र साकारण्यात आले आहे.

लक्ष्मी रस्त्यावरील श्री गजानन मंडळाच्या वतीने शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनच्या सहयोगाने भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार हेमंत रासने, अध्यक्ष राकेश गाडे, हर्षद पाचंगे, महेश जाधव, स्वप्निल पगारिया, शुभम जैन, सारंग भिरंगी, अमेय गाडे, ओमकार भोसले, प्रतीक जाधव, आकाश पाचंगे, निनाद पाचंगे, मयूर भिरंगी, प्रितेश चव्हाण उपस्थित होते.
स्वराज्याची शपथ, रांझ्याच्या पाटलाला कठोर शिक्षा, सुरत स्वारी, पुरंदरचा तह, जिजाऊंना सती जाण्यापासून रोखण्याचा प्रसंग, आग्रा दरबारातील सिंहगर्जना, आग्र्याहून गरुडभरारी, गड आला पण सिंह गेला, आरमाराचे बळकटीकरण, समर्थ रामदास आणि शिवराय, शिवराज्याभिषेक या कथा प्रसंगावर रांगोळ्या पाहण्याची संधी पुणेकरांना मिळाली.
पाण्यावरील आणि पाण्याखालील रांगोळी, प्रतिबिंब रांगोळी यांसह ३ डी रांगोळी अशा विविध माध्यमातील रांगोळी पाहण्याची संधी प्रदर्शनात मिळत आहे. दिनांक २० फेब्रुवारी पर्यंत दिवसभर पुणेकरांना हे प्रदर्शन पाहता येणार आहे.
मंडळाच्या वतीने आयोजित उत्सवात मेघना झुझम यांचा माँसाहेब जिजाऊ व मी तुमची सावित्रीबाई फुले या विषयावर एकपात्री प्रयोग झाला. लेखक व शिवव्याख्याते सौरभ करडे यांचे शिवरायांचे राष्ट्रीयत्व या विषयावर व्याख्यान देखील झाले.
