पुणे : तब्बल ३५० वर्षांपूर्वी शेकडो वर्षाच्या गुलामगिरीत अडकलेला आपला देश, संस्कृती आणि समाजाला छत्रपती शिवाजी महाराज यांनी मुक्त केले. जिजाऊंनी शिवरायांसारखे आदर्श निर्माण केले. कोणत्याही एका धर्म आणि पंथांसाठी नाही तर मानवतेच्या कल्याणासाठी शिवरायांनी स्वराज्य निर्माण केले. शिवरायांसारखे आदर्श व्यक्ती हे राष्ट्र आणि समाजाचा पाया असतात. असे मत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांनी व्यक्त केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने भव्य शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या प्रांगणातून मिरवणूकीला प्रारंभ झाला. यावेळी तब्बल १००० पेक्षा अधिक विद्यार्थी पांरपारिक वेशात रॅलीमध्ये सहभागी झाले होते. यावेळी श्री शिवाजी मराठा सोसायटीचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे, नियामक मंडळ अध्यक्ष सत्येंद्र कांचन, कारभारी मंडळ अध्यक्ष सुरेश देसाई, कमल व्यवहारे उपस्थित होते.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांनी धर्मांध, अत्याचार आणि अन्यायाविरोधात लढा दिला. त्यांनी जगाला गनिमी कावा शिकवला. हजारोंच्या फौजांना अगदी थोड्या सैनिकांसोबत लढा देऊन पराभूत केले. कोणत्याही लोकशाही राष्ट्राला आजही आदर्श ठरतील असे राज्य शिवरायांनी स्थापन केले.
श्री शिवाजी मराठा सोसायटीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू झाली. बाजीराव रस्त्यामार्गे चितळे बंधू मिठाईवाले – महात्मा फुले मंडई – शिवाजी रोड मार्गे पुन्हा श्री शिवाजी मराठा सोसायटीमध्ये मिरवणूकीचा समारोप झाला.
छत्रपती शिवराय असलेला रथ मिरवणूकीत होता यासोबतच नगारा, शिवगर्जना पथकाचे ढोल ताशा वादन आणि गंधर्व बँडचे वादन मिरवणूकीत झाले. श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सर्व शाखांचे विद्यार्थी आणि शिक्षक उत्सवात सहभागी झाले होते. यावेळी महिला सबलीकरण पर्यावरण जागृती, राष्ट्रीय एकात्मता, स्वच्छ भारत आदी संदेश विद्यार्थ्यांनी दिले.