पुणे- महानगरपालिकेत ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती गठीत केली जाणार आहे. तसेच ज्येष्ठ
नागरिक लोकशाही दिन देखील साजरा केला जाणार आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत.
पुणे शहरात वास्तव्यास असलेले ज्येष्ठ नागरिक हे महानगरपालिकेमार्फत प्रदान करत असलेल्या दैनंदिन नागरी सुख सुविधाबाबत उदभवणाऱ्या समस्यांविषयी तक्रारी तसेच नाविन्यपुर्ण उपाय योजना व गाऱ्हाणी वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे मांडत असतात. या तक्रारींचे निराकरण करणे, तसचे सुचविलेली कामे यांची दखल घेणेचे अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेल्या तक्रारीचे निवारण करण्याच्या दृष्टीने ‘पुणे महानगरपालिका ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती व लोकशाही दिन चे स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
या करिता अधिकारी / कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समितीच्या कामकाजावर अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) यांचे नियंत्रण राहील.
अतिरिक्त आयुक्त यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, समितीच्या विहीन कामकाजाच्या वेळेत उपस्थित ज्येष्ठ नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे निराकरण करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना ( अर्ज स्वीकारणे, मार्गदर्शन करणे, संबंधित विभागाशी तक्रारींच्या अनुषंगाने समन्वय करणे, विभागप्रमुख / खातेप्रमुख यांना अवगत करणे, वर्ग केलेल्या तक्रार अर्जाचे व केलेल्या कार्यवाहीचा पाठपुरावा करणे, तक्रारींचे निराकरण झाल्यानंतर संबंधित विभागामार्फत अर्जदारास समपक व समाधानकारक उत्तर देणे इ.) करण्यात याव्यात. किरकोळ स्वरुपाच्या तक्रारींबाबत विभागांशी समन्वय करून शक्यतो सत्वर निराकरण करण्याबाबत भर देण्यात यावा. अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) हे ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समितिच्या व लोकशाही दिनाचे कामकाजावर नियंत्रण ठेवतील. नियुक्त समितीने या बाबतचा कामकाज वस्तुनिष्ठ अहवाल अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे मार्फत महापालिका आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचेकडे दर १५ दिवसांनी अवलोकनार्थ सादर करायचा आहे. असे आदेश अतिरिक्त आयुक्त यांनी दिले आहेत.
– अधिकाऱ्याचे नाव व हुद्दा
मिलींद मधुकर करमरकर, उप अभियंता अतिरिक्त महापालिका आयुक्त (ज) कार्यालय : अध्यक्ष
असंग रामदास पाटील, उप समाज विकास अधिकारी : सदस्य
अस्मिता कुलकर्णी, प्रशासन अधिकारी : सदस्य सचिव
दिपक एकनाथ फणसे, उप अधिक्षक : सदस्य