आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या वतीने आयोजन
पुणे : श्री शिवाजी मराठा सोसायटीच्यावतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तेजस पाटीलने प्रथम क्रमांक पटकावित देशभक्त केशवराव जेधे करंडकाचा मानकरी ठरला आहे. तर यश पाटील यांनी द्वितीय तर चैतन्य कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
शुक्रवार पेठेतील श्री शिवाजी मराठा सोसायटीच्या सभागृहात स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ पार पडला. स्पर्धेचे उद्घाटनसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई यांच्या हस्ते झाले तर पारितोषिक वितरण समारंभ टीकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते झाले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. दिपाली आर. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र जगताप, मानद सचिव अण्णा थोरात, सहसचिव विकास गोगावले, खजिनदार जगदीश जेधे उपस्थित होते. या स्पर्धेचे हे तृतीय वर्ष होते.
स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला १११११, द्वितीय क्रमांकाला ७७७७, तृतीय क्रमांकाला ५५५५ आणि उत्तेजनार्थ क्रमांकाना प्रत्येकी ११११ रोख तसेच करंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
पनवेलच्या महात्मा फुले महाविद्यालयाच्या यश पाटील याने द्वितीय तर गारगोटीच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयाच्या चैतन्य कांबळे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या चैतन्य बावधाने, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या भक्ती धावले, सप महाविद्यालयाच्या रमेश कचरे, बी जे एस महाविद्यालयाच्या गोविंद भांड, स्वराज महाविद्यालयाच्या उत्कर्षा शिंदे यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली.
संजय चाकणे म्हणाले, महाराष्ट्राला वक्तृत्वाची मोठी परंपरा आहे. लोकमान्य टिळक, केशवराव जेथे यांसारख्या अनेक वक्त्यांनी महाराष्ट्र गाजवला. या वक्तृत्वामुळेच मुंबई सह महाराष्ट्र मिळाला. बोलणे सोपे असते परंतु काय बोलावे हे अवघड आहे. त्यासाठी वाचन करायला हवे, असेही त्यांनी सांगितले.
दिपाली आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले. डॉ. संतोष यादव यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अमित गोगावले यांनी आभार मानले.