महेश प्रोफेशनल फोरम तर्फे आयोजन ; देशभरातून मान्यवरांची उपस्थिती ; मेगा एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील १०० स्टॉलचा सहभाग ; विनामूल्य प्रवेश
पुणे : महेश प्रोफेशनल फोरम चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत असलेल्या महेश प्रोफेशनल फोरमच्या वतीने न्याती प्रस्तुत संविद २०२५ परिषद आणि मेगा एक्स्पो चे आयोजन दि.२२ व २३ फेब्रुवारी रोजी बिबवेवाडी येथील गंगाधाम रस्त्यावरील वर्धमान लॉन्स येथे करण्यात आले आहे. यामध्ये देशभरातून विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थित राहणार असून मेगा एक्स्पोमध्ये विविध क्षेत्रातील १०० स्टॉलचा सहभाग असणार आहे, अशी माहिती फोरमच्या अध्यक्षा श्रुती करनानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला सीए समीर लढ्ढा, कांतीलाल बदले, अतुल नावंदर, आशिष जाजू, निहार लढ्ढा, रोहित मोहता, प्रिती मालपाणी, प्रितेश मणियार, महेश बागल आदी उपस्थित होते.
संविद २०२५ परिषदेचे उद्घाटन शनिवार, दि. २२ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. यावेळी न्याती ग्रुपचे नितीन न्याती, भारतीय जनता पक्षाचे माजी राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सामाजिक उद्योजकता आणि महिला सबलीकरण या दोन विषयांवर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच उद्योजकता आणि नेटवर्किंग बाबत देखील परिसंवाद होतील.
रविवार, दि. २३ रोजी ‘व्यापार सेतू’ हा विशेष कार्यक्रम होणार आहे. यामध्ये ३०० हून अधिक उद्योजक सहभागी होणार आहेत. उद्योजकता विकास याबाबत यामध्ये चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण होणार आहे. उद्योजकता विकासातून राष्ट्रप्रगती साधण्याकरिता हे महत्वाचे पाऊल असून मेगा एक्स्पोमध्ये सेवा, अर्थ, कर्ज, बांधकाम, फर्निचर, किरकोळ विक्री आणि ज्वेलरी सह विविध क्षेत्रातील उद्योगांचा सहभाग असणार आहे. दोन दिवसीय परिषदेला विनामूल्य प्रवेश असून पुणेकरांनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले.