रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाहांवर सेमिनारमध्ये तज्ञांचे मत ; रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने आयोजन
पुणे : वैद्यकीय क्षेत्राचा विचार केला तर त्यामध्ये अनेक शाखा आहेत. मात्र, एक्सरे विभागाचे महत्व त्यामध्ये मोठे आहे. रुग्णावर अंतिम उपचार काय करायचे, हे एक्सरे सारख्या सर्व तपासण्यांची मदत घेऊन करावे लागते. आता पूर्वीसारखी डार्क रुम ही संकल्पना अतित्वात नाही. मात्र, नवीन तंत्रज्ञान आले असले, तरी देखील अचूक व सुयोग्य निष्कर्षासाठी रेडिओग्राफर्सचे महत्व कमी होणार नाही, असे मत रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाहांवर आयोजित सेमिनारमध्ये तज्ञांनी व्यक्त केले.
रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने पूना हॉस्पिटल आॅडिटोरियममध्ये रेडियोलॉजीमधील रेडिएशन सुरक्षा आणि नवीन प्रवाहांवर लक्ष केंद्रित करणा-या ‘रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाह’ या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. एप्ट मेडिकल सिस्टिम्सचे संचालक केतन आपटे, गीता आपटे, रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश तांबे, माजी अध्यक्ष जगदीश जगताप आदींनी या सेमिनारचे आयोजन केले होते.
सेमिनारमध्ये प्रख्यात ज्येष्ठ रेडियोलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास नाटेकर, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. डी. डी. शेट्टी आणि डॉ. लाखकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. याशिवाय,एइआरबी च्या रेडिएशन सुरक्षा आणि नियामक बाबींमध्ये विशेषतज्ञ असलेले वैज्ञानिक अधिकारी हर्ष देसले, अनुभवी रेडियोग्राफर चंद्रकांत शहाणे आणि बायोमेडिकल अभियंते अशोक श्रृंगारपूरे, अनिल जठार, समीर श्रृंगारपूरे आणि मुथुकुमार इत्यादी आपले विचार मांडले. तर, रेडियोलॉजिस्ट, रेडियोग्राफर आणि अभियंता यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात आले. प्रमुख वक्त्यांव्यतिरिक्त सन्मानितांमध्ये सुधाकर रणदिवे , रत्नकांत नाईक, नाडुकरन, तानाजी जगताप, सुभाष बनसोडे, आणि प्रल्हाद कांबळे यांचा समावेश होता.
डॉ. आर.व्ही.परांजपे म्हणाले, एक्सरे साठी रुग्णांशी संवाद ही कला यायला हवी. तसेच ती प्रक्रिया सुरु असताना काही अपघात घडल्यास त्या स्थितीला सामोरे जाण्याची क्षमता देखील रेडियोग्राफर्सकडे असणे गरजेचे आहे. आता रेडिओलॉजीमध्ये एआय आले आहे. एक्सरे चे तंत्रज्ञान मोठे होत आहे. हे हाताळण्याचे काम तंत्रज्ञ म्हणजेच रेडियोग्राफर्स करीत असतात, असेही त्यांनी सांगितले.
हर्ष देसले म्हणाले, रेडिएशन ही एक एनर्जी आहे. त्यामुळे ती प्रक्रिया करीत असताना सुरक्षा घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कामाचा अनुभव, उपकरणांची काळजी, ज्या ठिकाणी उपकरण बसवू त्या जागेची योग्य निवड अशा अनेक गोष्टी यामध्ये महत्वाच्या आहेत. सुरक्षा नियमावलीप्रमाणे सर्व उपकरणे आहेत की नाही, हे तपासणे देखील गरजेचे असते. उपकरणांचा वापर हा माणसांसाठी होत असतो, त्यामुळे त्या उपकरणाची गुणवत्ता तपासणी ही देखील आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
केतन आपटे म्हणाले, सेमिनारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रेडियोलॉजीमध्ये सुरक्षा प्रोटोकॉल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांबद्दल सहभागींना शिक्षित करणे, हा होता. तसेच रेडियोग्राफरच्या दृष्टिकोनातून एक्स-रे तंत्रज्ञानातील बदल, एक्स-रे तंत्रज्ञानाचा विकास, आणि रेडियोलॉजीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर सखोल चर्चा झाली. पुणे जिल्ह्याच्या विविध भागांतील तज्ञ तसेच विद्यार्थी देखील सहभागी झाले होते.
डॉ. नाटेकर, महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ प्रॅक्टिसिंग रेडियोलॉजिस्ट, यांनी त्यांच्या ‘गोल्डन लाईफ’ या भाषणात फलदायी, अर्थपूर्ण, निरोगी आणि आनंदी जीवन कसे जगावे यावर चर्चा केली आणि सेमिनारची सांगता केली.एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड, रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि वैरेक्स इमेजिंग इंडिया प्रा. लि. यांनी या उपक्रमाला सहकार्य केले होते.