पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२५:महापारेषणच्या २२० केव्ही पिरंगुट-कांदळगाव अतिउच्चदाबाच्या टॉवर लाइनमध्ये सोमवारी (दि. १७) किरकोळ बिघाड झाल्यामुळे महावितरणच्या १४ उपकेंद्रांचा वीजपुरवठा खंडित झाला. परिणामी सकाळी ११.५० ते १२.२५ पर्यंत महावितरणच्या १ लाख ४२ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. महापारेषणकडून युद्धपातळीवर उपाययोजना करून ३५ मिनिटांमध्ये वीजवाहिनी पुन्हा कार्यान्वित करण्यात आली.
याबाबत माहिती अशी की, महापारेषणच्या पिरंगुट-कांदळगाव २२० केव्ही अतिउच्चदाबाच्या वीजवाहिनीत आज सकाळी ११.५० वाजता किरकोळ बिघाड झाला. त्यामुळे महावितरणच्या मुळशीमधील भरे उपकेंद्र तसेच हिंजवडी परिसरातील १३ उपकेद्रांचा वीजपुरवठा बंद पडला. त्यामुळे मुळशी, भुगाव, भुकूम, पिरंगुट, पौड, माले, मुठा खोरे, मारूंजी, जांभे, नेरे आदी भागातील सुमारे ९७ हजार वीजग्राहकांचा आणि हिंजवडी परिसरातील २०० उच्चदाब ग्राहकांसह ४५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला. महापारेषणकडून अतिउच्चदाब वीजवाहिनी कार्यान्वित केल्यानंतर दुपारी १२.२५ वाजता सर्व ठिकाणी वीजपुरवठा पूर्ववत झाला.