धानोरी, लोहगाव शाखा कार्यालयांमुळे ६९ हजारांवर वीजग्राहकांना दर्जेदार सेवा
पुणे, दि. १७ फेब्रुवारी २०२५:महावितरणच्या नगररोड विभाग अंतर्गत धानोरी शाखा कार्यालयाचे विभाजन करून नवीन लोहगाव शाखा कार्यालयाची व नवीन १८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे. नवीन वास्तुसह लोहगाव शाखा कार्यालय मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते नुकतेच कार्यान्वित करण्यात आले.
वाढत्या नागरीकरणामुळे महावितरणकडून धानोरी व लोहगावसाठी स्वतंत्र शाखा कार्यालय सुरू झाले असून या दोन्ही कार्यालयांमुळे व वाढलेल्या तांत्रिक मनुष्यबळामुळे सुमारे ६९ हजार वीजग्राहकांना आणखी दर्जेदार वीजसेवा मिळणार आहे.
नगररोड विभागाच्या विश्रांतवाडी उपविभागातील धानोरी, लोहगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून नागरीकरणाचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी धानोरी शाखा कार्यालयाच्या विभाजनाचा प्रस्ताव महावितरण मुख्यालयास सादर केला होता. त्यास मुख्यालयाने मान्यता दिली. त्याप्रमाणे धानोरी शाखा कार्यालयाचे विभाजन करण्यात आले. यात २८ हजार ७०० वीजग्राहकांसाठी नवीन लोहगाव शाखा कार्यालयासह १ सहायक अभियंता, १ कार्यालयीन सहायक, २ प्रधान तंत्रज्ञ, ६ वरिष्ठ तंत्रज्ञ आणि ८ तंत्रज्ञ अशी १८ पदांची निर्मिती करण्यात आली आहे.
महावितरणच्या जागेतच उभारलेल्या लोहगाव शाखा कार्यालयाचे मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी अधीक्षक अभियंता श्री. अरविंद बुलबुले, कार्यकारी अभियंता श्री. अशोक जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. सारंगधर केणेकर, सहायक अभियंता श्री. राहुल बेंद्रे व जनमित्रांची उपस्थिती होती. यावेळी श्री. पवार यांनी सर्वांशी संवाद साधला व वीजग्राहकांना दर्जेदार वीजसेवा देण्याची सूचना केली.