पुणे- मंगळवार पेठेतील डॉक्टर आंबेडकर भवन लगतची म्हणजे ससून डेड हाउस च्या अगदी समोरची सव्वादोन एकराची जागा जिचे आज बाजार मूल्य ४०० कोटीच्या घरात असल्याचे बोलले जाते ती जागा एका बड्या मंत्र्याशी संबधित असलेल्या बिल्डरला अवघ्या ६० ते ७० कोटीत विकल्याची माहिती पुढे येते आहे. या संदर्भात पुण्यातल्या अनेकांनी चुप्पी साधली असून एवढे मोठे प्रकरण दडपले कसे यावर आश्चर्य व्यक्त होत आहे .
पूर्वी हि जागा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीची होती ती त्यांनी एम एस आर डीसी ला ९९ वर्षाच्या लीजने दिली . आणि MSRDC ने रिंग रोडला भाग भांडवल हवे म्हणून तब्बल ४०० कोटीची हि जागा एका मंत्र्याशी संबधित अशा बिल्डरला अवघ्या ६० ते ७० कोटीत बहाल करून टाकली असे वृत्त येथे समजले आहे. हे सारे कसे चिडीचूप पद्धतीने झाले यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. आंबेडकर भवन ला पार्किंग साठी हि जागा द्यावी , ससून लाच कॅन्सर रुग्णालय उभारण्यासाठी हि जागा द्यावी अशा मागण्या होत असताना सरकारी जागा विकण्याचा हा डाव यशस्वी करण्यात आलाच कसा? असा प्रश्न आता उपस्थित होतो आहे. आणि पुण्यातील नेते मंडळी याबाबत नेमकी काय भूमिका घेणार कि ते सहज पणे दुर्लक्ष करत चुप्पी साधणार हे काळच प्रत्यक्ष दर्शविणार आहे .