मुंबई, दि. १६ फेब्रुवारी २०२५ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना कृषी पंपांसाठी दिवसा वीज पुरवठा व्हावा म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० या योजनेला ऊर्जा क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी प्रतिष्ठेचा स्कोच सुवर्ण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचसोबत महावितरणच्या सौर ग्राम योजनेला स्कोच रजत पुरस्कार मिळाला. महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी शनिवारी नवी दिल्ली येथे हे पुरस्कार स्वीकारले.
स्कोच समुहातर्फे दरवर्षी सार्वजनिक क्षेत्रात उपयुक्त ठरलेल्या विविध योजनांसाठी पुरस्कार देण्यात येतात. विविध तज्ज्ञांकडून अत्यंत काटेकोरपणे परीक्षण होऊन ज्युरींच्या मतांच्या आधारे हे पुरस्कार दिले जातात. सार्वजनिक क्षेत्रातील योजनांसाठीचे हे पुरस्कार प्रतिष्ठेचे मानले जातात.
अपर मुख्य सचिव ( ऊर्जा ) आभा शुक्ला यांच्या संयोजनात राज्याचा ऊर्जा विभाग, महावितरण आणि महसूल विभागातर्फे समन्वयाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या योजनेत विकेंद्रित स्वरुपात सौर ऊर्जा निर्मिती करून त्यावर कृषी पंप चालविण्यात येतात. मा. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एप्रिल २०२३ मध्ये ही योजना सुरू झाल्यानंतर गतीने अंमलबजावणी सुरू आहे. आतापर्यंत ४९ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यांची क्षमता २०३ मेगावॅट आहे. मार्च २०२६ पर्यंत ही योजना पूर्ण होईल व राज्यातील सर्व कृषी पंप सौर ऊर्जेवर चालविण्याचे स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळे सौर कृषी पंपांसाठी १६ हजार मेगावॅट सौर ऊर्जानिर्मिती क्षमता निर्माण होणार आहे. ही जगातील सर्वात मोठी विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती योजना आहे.
मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० मुळे कृषी पंपांना दिवसा व दर्जेदार वीज पुरवठा होईल व शेतकऱ्यांची अनेक दशकांची मागणी पूर्ण होईल. त्यासोबत या योजनेत अत्यंत किफायतशीर दरात वीज उपलब्ध होत असल्याने महावितरणचा वीज खरेदीचा खर्च कमी होऊन उद्योगांवरील क्रॉस सबसिडीचा बोजा दूर करण्यात मदत होत आहे. या योजनेमुळे राज्यात खासगी विकसकांकडून ६६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असून ग्रामीण भागात ७० हजार रोजगार निर्माण होत आहेत. ही ऊर्जा क्षेत्रातील गेम चेंजर योजना आहे.
महावितरण राज्यात सौर ग्राम योजनेत १०० गावे विकसित करत आहे. या योजनेत गावामध्ये छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून सर्व घरांसाठी लागणारी वीज गावातच निर्माण केली जाते. त्यासोबत ग्रामपंचायत कार्यालय, रस्त्यावरील दिवे, जिल्हा परिषदेची शाळा, पाणी पुरवठा योजना अशा सर्वांसाठी सौर ऊर्जा वापरली जाते. त्यामुळे गावाचे वीजबिल शून्य होते तसेच पर्यावरण रक्षणाला मदत होते. सातारा जिल्ह्यातील मान्याचीवाडी हे राज्यातील पहिले सौर ग्राम ठरले आहे. आतापर्यंत सहा गावे सौर ग्राम झाली आहेत.