वाराणसी: महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी १४ फेब्रुवारी रोजी प्रयागराज येथे पवित्र गंगेत अमृतस्नान केल्यानंतर १५ फेब्रुवारी रोजी काशी विश्वेश्वर मंदिरात भक्तीभावाने दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांची भगिनी जेहलम जोशी उपस्थित होत्या.
काशीला जाताना त्यांनी गंगेतून बोटीने प्रवास करत भोसले घाट, गणेश मंदिर (पेशवे घाट), सिंधिया घाट आणि पशुपतिनाथ मंदिराचेही दर्शन घेतले. काशी विश्वेश्वराच्या पवित्र दर्शनानंतर त्यांनी कृतज्ञतेने वंदन केले आणि खास मुंबईहून आणलेल्या पुरणपोळ्यांचा नैवेद्य अर्पण केला.
यावेळी त्यांनी श्री अन्नपूर्णा देवी आणि श्री बद्रीनाथजी यांचेही दर्शन घेतले. तसेच ज्ञानवापी मंदिराची झलक पाहण्याचा योगही आला. या संपूर्ण यात्रेदरम्यान त्यांनी आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरणाचा अनुभव घेतला.
याप्रसंगी भावना व्यक्त करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “भारतामध्ये गंगामाता आणि बारा ज्योतिर्लिंगांचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. पौर्णिमेनंतर वाराणसी येथे काशी विश्वेश्वरांचे दर्शन झाल्याने मनोभावे शांती लाभली. गंगेतील नौकाविहारामुळे ऐतिहासिक वारसा जिवंत झाल्यासारखे वाटले. काशी विश्वेश्वरांकडे मी प्रार्थना केली की, जगातील वाईट शक्ती नष्ट भाव्यात आणि जग शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करो.”
त्यांनी पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी विकास कार्याचे कौतुक करत महाराष्ट्रातील आगामी कुंभमेळ्यासाठी अनेक गोष्टी शिकण्यासारख्या असल्याचे सांगितले.