कै. सौ. तिलोत्तमा प्रकाश निफाडकर स्मृती कर्मयोगिनी पुरस्काराने मीरा शिंदे यांचा गौरव
पुणे : आई क्षणोक्षणी आपल्या भोवतीच असते. ती शरीर रूपाने आपल्या जवळ नसली तरी तिचे अस्तित्व आपल्या भोवती धुक्यासारखे लपेटलेले असते. सागरासारखी व्याप्ती असलेल्या आईच्या मनाचा तळ शोधणे सोपे नाही. आईचे आईपण आपल्यात ओतप्रोत भरून घेतल्यानंतर आपल्याला आई कळते, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री, लेखिका मीरा शिंदे यांनी केले. आईच्या आठवांचा जागर पुरस्कार रूपाने करणे ही मोलाची गोष्ट आहे. कर्मयोगिनी पुरस्कार म्हणजे आईचा आशीर्वाद होय, असेही त्या म्हणाल्या.
कै. सौ. तिलोत्तमा प्रकाश निफाडकर यांच्या स्मरणार्थ यंदाच्या कर्मयोगिनी पुरस्काराने मीरा शिंदे यांचा गौरव करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. पुरस्काराचे वितरण कवयित्री मृणालिनी कानिटकर-जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह ॲड. प्रमोद आडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय विचार साधना सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कवयित्री तनुजा चव्हाण यांच्या आईंच्या स्मृतिप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या पुरस्काराचे यंदाचे सहावे वर्ष आहे. नितीन चव्हाण या वेळी मंचावर होते. ज्येष्ठ विचारवंत, महाराष्ट्र राज्य विश्वकोष मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित, ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी आदी उपस्थित होते.
मीरा शिंदे पुढे म्हणाल्या, आईचे आशीर्वाद आणि आठव मनात धरून आपण आयुष्यातील अनेक चढउतारांना सामोरे जाऊ शकतो. या पुरस्काराच्या निमित्ताने आईच्या आईपणाचा जागर होत आहे.
अध्यक्षपदावरून बोलताना मृणालिनी कानिटकर-जोशी म्हणाल्या, कर्मयोगिनी पुरस्कारामागील भावना मोलाची आहे. हा पुरस्कार फक्त कवितेचाच नव्हे तर कवयत्रीचा देखील आहे. मीरा शिंदे यांच्या कविता राजस, डौलदार आणि ऋजू असून अंतर्मुख भावनेतून व्यक्त झालेल्या आहेत. निसर्गाने दिलेल्या कवितेच्या दानाची कोमल ऱ्हदयाने काळजी घेत मीरा शिंदे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत.
ॲड. प्रमोद आडकर म्हणाले, तनुजा चव्हाण यांनी आईच्या नावाने दिलेल्या कर्मयोगिनी पुरस्काराने त्यांच्या स्मृती जतन केल्या आहेत. कविता म्हणजे केवळ शब्द नव्हे तर ती तुमच्या गालावरील आसवे पुसते, कधी वार करणारी तलवार बनते. कधी पाठीवर मित्रत्वाचा हात ठेवते. समाजात घडणाऱ्या चांगल्या-वाईट घटना, मनातील घुसमट, विचारांची गर्दी कवी मन टिपते आणि त्यातून कविता निर्माण होते.
सुरुवातीस तनुजा चव्हाण यांनी पुरस्कारमागील भूमिका विशद केली तर प्रास्ताविक नितीन चव्हाण यांनी केले.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात भारती पांडे, माधव हुंडेकर, मिलिंद धेंडे, कांचन सावंत, नूतन शेटे, सुजित कदम, ऋचा कर्वे, चंचल काळे, अतुल कुलकर्णी, राहुल शिंदे यांचा सहभाग होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिल्पा देशपांडे यांनी केले.