१. खातेदारांना बँकेतून पैसे काढता येणार नाहीत
२. बँकेला नव्याने कर्ज वाटप करता येणार नाही
३. जुन्या कर्जाला मुदतवाढही देता येणार नाही
४. बँकेला कुठेही गुंतवणूक करता येणार नाही
मुंबई- भारतीय रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह (सहकारी) बँकेवर सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लागू केलेे. याची माहिती मिळताच बँकेतून पैसे काढण्यासाठी व्यापारी आणि ठेवीदारांनी बँकेबाहेर एकच गर्दी उसळली होती. त्यांना पैसे मिळणार नाहीत, असे सांगून परत पाठवण्यात आले. आमचे पैसे कधी मिळणार ? अशीच चिंता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर पसरली होती. दर महिन्याचा घरखर्च, शाळेची फी, औषधी, ईएमआयचा खर्च कसा करायचा, असाच सवाल हजारो ग्राहकांनी अश्रूंना वाट करून देत उपस्थित केला.
न्यू इंडिया को-ऑपरेटिव्ह बँकेच्या कामकाजात अनियमितता आढळून आली आहे. बँकेला २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांत सुमारे ५३ कोटींचा तोटा आला आहे. म्हणून आरबीआयने गुरुवार, १३ फेब्रुवारी २०२५ पासून निर्बंध लागू केले. म्हणून शुक्रवारी सकाळी आठ वाजेपासूनच हजारो ठेवीदारांनी बँकेच्या मुंबईतील शाखेबाहेर मोठी गर्दी केली होती. बँकेकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने कर्मचाऱ्यांवर प्रश्नाचा भडिमार करीत संताप व्यक्त केला. अखेर त्यांना लॉकरमधील दागिने वस्तू काढण्याची परवानगी देण्यात आली. कर्मचाऱ्यांचे पगार, बँकेचे भाडे आणि इतर महत्त्वाच्या कामांची बिले दिली जातील. ठेवीदारांना क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांपर्यंतचा दावा करता येईल, असे सांगण्यात आले. बँकेच्या मुंबईतील अंधेरी, बांद्रा, बोरिवली, चेंबूर, घाटकोपर, गिरगाव, गोरेगाव, नरिमन पॉइंट, कांदिवली, मालाड, मुलुंड, सांताक्रूज, वर्सोवा तर नवी मुंबईत नेरूळ आणि ठाणे जिल्ह्यात मीरा रोड, माजिवडे पाचपाखाडी, पालघर जिल्ह्यात वसई-विरारमध्ये, पुण्यात बिबवेवाडी येथे शाखा आहेत. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये बँकेला तब्बल ३० कोटी ७५ लाख रुपयांचा तोटा झाला होता, तर आर्थिक वर्ष २०२४ मध्ये बँकेला २२ कोटी ७८ लाख रुपयांचा तोटा झाला आहे.