“संगम स्नान हा माझ्यासाठी आध्यात्मिक आणि भावनिक आनंदाचा क्षण” – डॉ. नीलम गोऱ्हे
प्रयागराज, दि. १४ : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती यांच्या त्रिवेणी संगमात पवित्र अमृत स्नान करून आध्यात्मिक परंपरेचा अनोखा अनुभव घेतला. त्यांनी पितृऋण, परिवार ऋण आणि सर्व देवदेवता ऋण स्मरून, विष्णु, शिव आणि कृष्ण यांना अर्घ्य अर्पण करत विशेष प्रार्थना केली.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश सरकारने भव्य नियोजन करून त्रिवेणी संगम परिसरात उत्कृष्ट व्यवस्था केली होती. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यांच्या व्यवस्थेसाठी सहकार्य केल्यामुळे डॉ. नीलम गोऱ्हे यांनी त्यांचे आभार मानले.
उत्तर प्रदेश सरकारच्या वतीने शिक्षण विभाग अधिकारी अजय प्रताप सिंह आणि क्रीडा विभाग अधिकारी विजय श्रीवास्तव यांनी डॉ. नीलम गोऱ्हे यांचे औपचारिक स्वागत केले.
यावेळी भावना व्यक्त करताना डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या, “या पवित्र संगमावर स्नान करणे हा केवळ विधी नाही, तर तो एक आध्यात्मिक आणि भावनिक ऊर्जा मिळवण्याचा अनमोल क्षण आहे. उत्तर प्रदेश सरकारने केलेल्या भव्य नियोजनामुळे हा अनुभव अधिक सुंदर आणि अविस्मरणीय ठरला. मी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक आभार मानते.”