पुणे-जुन्या महापालिका हद्दीत नित्याने होणारी वाहतूक कोंडी आणि वायू व ध्वनी प्रदूषण कमी करायचे असेल तर महापालिकेने बॅटरीवरील छोट्या रिक्षा ,बस मोफत उपलब्ध करून द्याव्यात आणि खाजगी वाहनांना या परिसरात NO ENTRY करावी असा पर्याय आम आदमी पक्षाने सुचविला आहे.महापालिकेला आणि लाडक्या बहिणीला २१०० रुपये देणाऱ्या राज्य सरकारला हे अवघड नाही असेही म्हटले जाते आहे.
पुणे शहराची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत असून त्याबरोबर वाहनांची संख्या देखील लक्षणीय प्रमाणात वाढत आहे आणि या सर्व प्रकारामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. शहराच्या मध्यवस्तीत अनेक बाजारपेठा असल्याने शहराच्या उपनगरातून अनेक नागरिक खरेदी करता आपले वैयक्तिक वाहन घेऊन शहराच्या मध्यवर्ती भागात येत असतात, त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या अरुंद रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते व त्यातून वायु प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, पार्किंगची दुरावस्था यासारख्या समस्या निर्माण होत आहेत. पुणे महानगरपालिकेला सध्या तरी या समस्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य झालेले नसून भविष्यात देखील या सर्व समस्यांवर नियंत्रण मिळवणे शक्य होईल का? असा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने शहराच्या मध्यवर्ती भागातील रस्त्यांवर जास्तीत जास्त प्रमाणात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरली जावी ज्यात छोट्या बस तसेच ऑटो रिक्षा यांचा समावेश केला जावा अशी मागणी करण्यात आली आहे. महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना ऑटोरिक्षा मोफत उपलब्ध करून दिल्यास अनेक नागरिक पी एम पी एम एल ने प्रवास करून मध्यवर्ती भागापर्यंत येऊ शकतात व मध्यवर्ती भागातील प्रवास हा महापालिकेच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ऑटो रिक्षाने करू शकता. आम आदमी पक्षाचे उपाध्यक्ष चेंथिल अय्यर म्हणाले, मोफत ऑटो रिक्षा करण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ऑटो रिक्षाचे मीटर प्रमाणे दर ठरवून त्यांची महानगरपालिकेच्या माध्यमातून नेमणूक करावी. जेणेकरून रिक्षा चालकांना देखील मारलेल्या फेऱ्या प्रमाणे योग्य मोबदला महिन्याकाठी मिळू शकेल व रोजगाराची संधी उपलब्ध होईल, तसेच नागरिकांना देखील चांगला प्रवास मिळाल्याने शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.
वाढत्या शहरीकरणामुळे प्रवासाचे वेगवेगळे उपाय शोधणे गरजेचे असून त्याचाच एक भाग म्हणून ज्या ठिकाणी बस जाऊ शकणार नाही अशा ठिकाणी मोफत रिक्षा उपलब्ध करून दिल्यास नागरिकांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार असल्याचे पुढे बोलताना त्यांनी सांगितले.
सदर सुविधा ही नागरिकांना प्रायोगिक तत्त्वावर शहरातील काही भागात उपलब्ध करून दिल्यास त्याला मिळणारा प्रतिसाद पाहून शहराच्या इतर भागात देखील हा प्रकल्प राबवता येऊ शकतो. त्यामुळे आम आदमी पार्टीच्या या मागणीचा पुणे महानगरपालिकेने सकारात्मक विचार करून लवकरात लवकर इलेक्ट्रिक रिक्षा किंवा सीएनजी रिक्षा नागरिकांच्या सेवेसाठी मोफत उपलब्ध करून द्याव्यात, या सर्व सेवांसाठी महापालिकेने एक ॲप तयार करावे ज्याच्या अनुषंगाने प्रत्येक ट्रीप ची माहिती महापालिकेपर्यंत पोहोचली जाऊ शकेल. वाढत्या वाहतूक समस्येला आळा घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी अशा प्रकारे वेगवेगळे पर्याय शोधणे जरुरी असल्याने आम्ही ही मागणी करत आहोत असे यावेळी पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.