पुणे: सुमारे २५ वर्ष मोफत वीज देणाऱ्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेचा जागर करण्यासाठी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील विविध भागांमध्ये डिजिटल सौर रथाच्या माध्यमातून आठवड्याभरात तब्बल ५० हजारांवर वीजग्राहकांशी महावितरणकडून थेट संवाद साधण्यात आला तसेच डिजिटल स्क्रीनद्वारे संवाद, सादरीकरण व माहिती पत्रकांद्वारे या योजनेची माहिती देण्यात आली.
घरगुती ग्राहकांना घराच्या छतावर १ ते ३ किलोवॅट क्षमतेच्या अनुदानित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाद्वारे दरमहा सुमारे १२० ते ३६० युनिटपर्यंत वीज मोफत मिळविण्याची संधी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आहे. या योजनेचा जागर करण्यासाठी महावितरण व महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरर्स असोशिएशन (मास्मा) यांच्या सहकार्याने सौर रथाचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय राज्यमंत्री ना. श्री. मुरलीधर मोहोळ यांच्याहस्ते सौर रथाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, आमदार श्री. सिद्धार्थ शिरोळे, अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड, मास्माचे अध्यक्ष श्री. शशिकांत वाकडे, खजीनदार श्री. समीर गांधी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज सौर रथाच्या डिजिटल स्क्रिनद्वारे योजनेची माहिती देताना मुख्य अभियंता श्री. राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता श्री. सिंहाजीराव गायकवाड, ‘मास्मा’चे श्री. समीर गांधी यांनी नागरिकांशी आठवडाभर संवाद साधला. तसेच उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पाटणी यांनी या योजनेचे फायदे, ऑनलाइन अर्ज, मिळणारे अनुदान आदींचे संगणकीय सादरीकरण केले. हीच माहिती पत्रकांद्वारे देखील देण्यात आली.
आठवडाभर प्रामुख्याने दररोज दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत या सौर रथासोबत संबंधित अतिरिक्त कार्यकारी अभियंते, सहायक अभियंते व जनमित्रांनी सोसायट्या, अपार्टमेंट्समधील नागरिकांशी संवाद साधला. योजनेची माहिती दिली. यात शिवाजीनगर, बावधन, बाणेर, बालेवाडी, औंध, पाषाण, पिंपळे सौदागर, सांगवी, वाकड, काळेवाडी, भोसरी, मोशी, चऱ्होली, वारजे, कोथरूड, स्वारगेट, धनकवडी, पद्मावती, पर्वती, सिंहगड रस्ता, मार्केटयार्ड, हिंगणे, धायरी, नऱ्हे, एरंडवणे आदी भागात या सौर रथाद्वारे जागर करण्यात आला. या सौररथाच्या जागर मोहिमेत महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. शेखर मुरकुटे यांच्यासह अभियंते, जनमित्रांसह ‘मास्मा’चे रोहन उपासनी, संदीप गदबरे, नरेंद्र पवार, स्वप्निल बाथे आदींनी सहभाग घेतला.