पुणे 15: महिलांवरील वाढत्या हिंसाचाराला लक्षात घेता हिंसेला प्रेमानेच उत्तर दिले जाऊ शकते, हा संदेश देत सर्व व्यक्ती एकमेकांच्या व्हॅलेंटाइन्स आहेत, हे सांगत निर्भीड साऱ्या बनू ग… या थीमवर ओपन माईक सेशनमध्ये तरुणाईने उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. याला निमित्त होते 14 फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस. या प्रेमाच्या दिवशी फर्ग्युसन रस्त्यावर संध्याकाळी 6 वाजता रंगलेल्या या कार्यक्रमाच्या संयोजक समितीच्या सदस्य संगीता पाटणे यांनी सांगितले की हे रस्ते आमचेही आहेत, मात्र संध्याकाळ झाले की ते भेदभाव करायला लागतात. हे मोडीत काढत स्त्री पुरुष दोघांनीही हिंसेच्या विरोधात उभे राहिले पाहिजे, तेव्हाच ही परिस्थिती बदलेल. श्रद्धा रेखा राजेंद्र यांनी सांगितले की ‘वन बिलियन रायझिंग’ म्हणजे ‘हिंसेच्या विरोधात 100 कोटी’. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अभ्यासानुसार जगभरात प्रत्येक तीनपैकी एक स्त्री हिंसा सहन करते. म्हणजेच जगभरात 100 कोटी महिला हिंसा सहन करतात. म्हणून महिलांवर होणाऱ्या हिंसेच्या विरोधात जगभरातून आपण 100 कोटी उभे राहू या-One Billion Rising! हिंसामुक्त आणि न्यायपूर्ण समाजासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यावेळी महाविद्यालयीन तरुण तरुणींनी आपल्या वैयक्तिक अनुभवांपासून, नाटक, कविता, डान्स, ग्रुप डान्स, गाणी सादर करत हिंसेला विरोध केला. फुलपाखराच्या प्रतिकृती समोर ‘मी निर्भीड मी मुक्त’, ‘सहना नहीं, कहना सिखो’ असे संदेश देणारे प्लाकार्ड हातात घेऊन तरुणांनी सेल्फी आणि फोटो काढले. चळवळीच्या गाण्यांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी महिला जागर समितीच्या संगीता तिवारी, शोभा करंडे, असुंता पारधे, शशिकला ढोलेपाटील, नीता रजपूत, अलका जोशी आणि इतर सदस्य उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुणा देशपांडे आणि गीतांजली प्रकाश अंजली यांनी केले.
हिंसेला उत्तर प्रेमानेच…महिला जागर समिती आयोजित निर्भीड साऱ्या बनू ग ओपन माईक कार्यक्रमात तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग
Date: