जालना-मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे यांच्या भेटीवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. सुरेश धस व धनंजय मुंडे यांची भेट अत्यंत धक्कादायक आहे. आम्ही धसांवर खूप मोठा विश्वास दाखवला. पण त्यांनी राजकारण व सत्तेच्या आहारी जाऊन समाजाशी दगाफटका केला. आम्हाला त्यांच्याकडून अशी अपेक्षा नव्हती, असे जरांगे यांनी म्हटले आहे.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे हे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे अडचणीत सापडले होते. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणी त्यांच्यावर ‘आकाचा आका’ म्हणत टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांचा राजीनामाही मागितला होता. पण आता त्यांनीच धनंजय मुंडे यांची भेट घेऊन या प्रकरणी एकप्रकारे आपले शस्त्र टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे यांनी त्यांच्यावर शरसंधान साधले आहे.
मनोज जरांगे म्हणाले की, मंत्री धनंजय मुंडे व भाजप आमदार सुरेश धस यांच्या भेटीची गोष्ट माझ्या कानावर आली आहे. याविषयी माझ्याकडे जास्त माहिती नाही. त्यामुळे मला त्यावर फार काही बोलता येणार नाही. पण ही भेट झाली असेल तर फार धक्कादायक आहे. गोरगरिबांच्या लेकरांच्या न्यायासाठी आपण लढलात म्हणून या कोट्यवधी समाज बांधवांनी तुमच्यावर खूप मोठा विश्वास दाखवला होता. हा विश्वास अजूनही आहे, पण राजकारणाच्या व सत्तेच्या एवढे आहारी जाऊन समाजाशी असा दगाफटका करणे योग्य नाही. सुरेश धस यांच्याकडून असे काही होईल याची आम्हाला कदापीही अपेक्षा नव्हती.
मनोज जरांगे म्हणाले, पत्रकारांनी एकदा सुरेश धस यांना एक प्रश्न केला होता की, पंकजा मुंडे मंत्री झाल्यानंतर तुम्ही त्यांना शुभेच्छा देणार का? त्यावर त्यांनी अजिबात देणार नसल्याचा दावा केला होता. जे मला पाडायला उठले होते त्यांना मी शुभेच्छा देणार नाही असे ते म्हणाले होते. आता या माणसाने (धनंजय मुंडे) तर आपल्या समाजबांधवाचा खून केला आहे. क्रूरपणे हत्या केली. त्याला भेटण्यासाठी हे कसे गेले? हे शॉकिंग आहे. मला यावर विश्वास बसत नाही.
उल्लेखनीय बाब म्हणजे भाजप प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी धनंजय मुंडे व सुरेश धस यांची एका खासगी रुग्णालयात भेट घडवून आणल्याचा दावा केला जात आहे. महत्त्वाचे म्हणजे बावनकुळे यांनीही ही भेट झाल्याचे मान्य केले आहे. पण मुंडे यांच्या कार्यालयाने याविषयी कानावर हात ठेवलेत. बावनकुळे याविषयी बोलताना म्हणाले की, आम्ही जवळपास 4 तास एकत्र होतो. सुरेश धस व धनंजय मुंडे हे दोघेही होते. त्यांच्यात मतभेद आहेत, पण मनभेद नाहीत. ते दूर होतील. आयुष्यात एक काळ असतो, जो मतभेद दूर करतो. मी पक्षाचा अध्यक्ष आहे. दोघेही मला भेटले. या दोघांत कौटुंबिक भेट झाली. कुटुंब म्हणून आम्ही एकत्र बसलो होतो.

