तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? सुरेश धस यांच्या सवालाने संशयाचे धुके गडद
मुंबई- भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतल्याचे समोर आले आहे. धनंजय मुंडे यांना रात्री उशिरा रुग्णालयात नेले होते. त्यामुळे नेमके काय झाले याची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली आहे. तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? असा सवालही सुरेश धस यांनी पत्रकारांना केला आहे.
सुरेश धस धनंजय मुंडे यांच्या भेटीवर बोलताना म्हणाले, धनंजय मुंडे यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेटलो होतो. यात वेगळी काहीच चर्चा झाली नाही. आमचा लढा सुरूच राहणार आहे. तब्येतीची विचारपूस आणि लढा हे दोन वेगळे प्रकार आहेत. आम्ही त्यांच्या विरोधात आहोत. या लढ्यात काहीच फरक पडणार नाही. तब्येतीची विचारपूस करण्यात गैर काय आहे? तसेच या भेटीचा वेगळा अर्थ तुम्ही काढू नका, असा सल्ला देखील सुरेश धस यांनी पत्रकारांना दिला आहे.
दरम्यान, या भेटीवर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मी, धनंजय मुंडे आणि सुरेश धस साडेचार तास एकत्र होतो. धनंजय मुंडे आणि आमचे जुने संबंध आहेत. सुरेश धस आणि धनंजय मुंडे यांची परिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवारीक भेट म्हणून भेटलो. तसेच पुढे ते म्हणाले कॉम्प्रोमाइज करायला कोणी सांगितले नाही. आमच्यात मतभेद आहेत मनभेद नाहीत, असे बावनकुळे म्हणाले.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, माणसाच्या जीवनात थोडा काळ असा असतो, काळ मतभेद दूर करतो. काही काळाने धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांचे मतभेद दूर होतील. मी पक्षाचा अध्यक्ष आहे, माझ्याकडे दोघेही भेटले. धनंजय मुंडेंनी भाजपच्या प्रवासासोबत माझ्यासोबत काम केले आहे. त्यामुळे धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यातील भेट ही पारिवारीक भेट झाली आहे. आम्ही तिघेही परिवार म्हणून बसलो होतो. त्यांच्या मतभेद आहेत, मनभेद नाहीत.