पुणे जिल्ह्यातील तज्ञांचा सहभाग; रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने आयोजन
पुणे: रेडियोलॉजीमधील रेडिएशन सुरक्षा आणि नवीन प्रवाहांवर लक्ष केंद्रित करणारा सेमिनार पुण्यात होणार असून, याचे आयोजन रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रा. लि. यांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाह’ या शीर्षकाखालील हे सेमिनार रविवार, १६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३.३० या वेळेत पूना हॉस्पिटल आॅडिटोरियममध्ये होणार आहे, अशी माहिती केतन आपटे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पत्रकार परिषदेला रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्रचे अध्यक्ष रमेश तांबे, माजी अध्यक्ष जगदीश जगताप आणि एप्ट मेडिकल सिस्टिम्सचे संचालक केतन आपटे आणि गीता आपटे हे उपस्थित होते.
सेमिनारमध्ये प्रख्यात ज्येष्ठ रेडियोलॉजिस्ट डॉ. श्रीनिवास नाटेकर, डॉ. आर. व्ही. परांजपे, डॉ. डी. डी. शेट्टी आणि डॉ. लाख्खर यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. याशिवाय,एइआरबी च्या रेडिएशन सुरक्षा आणि नियामक बाबींमध्ये विशेषतज्ञ असलेले वैज्ञानिक अधिकारी हर्ष देसले, अनुभवी रेडियोग्राफर चंद्रकांत शहाणे आणि बायोमेडिकल अभियंते अशोक श्रृंगारपूरे, अनिल जठार, समीर श्रृंगारपूरे आणि मुथुकुमार इत्यादी आपले विचार मांडणार आहेत.
सेमिनारचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे रेडियोलॉजीमध्ये सुरक्षा प्रोटोकॉल आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांबद्दल सहभागींना शिक्षित करणे. तसेच रेडियोग्राफरच्या दृष्टिकोनातून एक्स-रे तंत्रज्ञानातील बदल, एक्स-रे तंत्रज्ञानाचा विकास, आणि रेडियोलॉजीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर सखोल चर्चा होणार आहे. पुणे जिल्ह्याच्या विविध भागांतील तज्ञ यावेळी सहभागी होणार आहेत.
याव्यतिरिक्त, सेमिनारमध्ये रेडियोलॉजिस्ट, रेडियोग्राफर आणि अभियंता यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. प्रमुख वक्त्यांव्यतिरिक्त सन्मानितांमध्ये अनंत तेलधुने, सुधाकर रणदिवे , सुधीर नाडर, रत्नकांत नाईक, नाडुकरन, तानाजी जगताप, सुभाष बनसोडे, आणि प्रल्हाद कांबळे यांचा समावेश आहे. एप्ट मेडिकल सिस्टिम्स प्रायव्हेट लिमिटेड, रेडियोग्राफर्स असोसिएशन आॅफ महाराष्ट्र आणि वैरेक्स इमेजिंग इंडिया प्रा. लि. यांनी या उपक्रमाला सहकार्य केले आहे.
रेडिएशन सुरक्षा आणि रेडियोलॉजीमधील नवीन प्रवाहांवर सेमिनार रविवारी
Date: