मुंबई-सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाप्रकरणी संकटात सापडलेल्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पाठिशी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे. एवढेच नाही तर त्यांच्यावर दृढविश्वास व्यक्त करत त्यांचा पक्षाने स्थापन केलेल्या बड्या नेत्यांच्या एका कोअर ग्रुपमध्येही समावेश केला आहे. यामुळे कितीही आरोप झाले तरी, धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादीतील ठळक स्थान अधोरेखित होत आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने शुक्रवारी पक्षाची संघटनात्मक बांधणी, धोरणात्मक निर्णय आणि जनविकासाच्या योजना व अंमलबजावणी यासाठी पक्षांतर्गत प्रमुख नेत्यांचा एक कोअर ग्रुप स्थान केला आहे. आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसह पक्षसंघटनेची बांधणी, त्यासाठीचे कार्यक्रम व पक्षासंदर्भातील महत्त्वाच्या धोरणांची आखणी व अंमलबजावणी करणे हा या कोअर ग्रुपचा महत्त्वाचा उद्देश आहे. या ग्रुपमध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचा समावेश करण्यात आला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने जारी केलेल्या निवेदनानुसार, या महत्त्वाच्या कोअर ग्रुपमध्ये पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ व संतोष देशमुख हत्या प्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या धनंजय मुंडे यांचा समावेश आहे. बीडमधील कथित गुन्हेगारीच्या मुद्यावरून धनंजय मुंडे यांना सर्वपक्षीय नेत्यांकडून टार्गेट केले जात असतानाही अजित पवारांनी या महत्त्वाच्या कोअर ग्रुपमध्ये त्यांचा समावेश केल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.दुसरीकडे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन धनंजय मुंडे यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे सादर केलेत. तसेच त्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली आहे. पण अजित पवारांसह फडणवीसांनी या प्रकरणी एकमेकांवर जबाबदारी ढकलत ही मागणी एकप्रकारे फेटाळून लावली आहे. विशेषतः अजित पवारांनी या प्रकरणी धनंजय मुंडे यांचा हात या प्रकरणी स्पष्ट होईपर्यंत त्यांचा राजीनामा न घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे मुंडे यांचे पक्षातील स्थान अधिक बळकट झाल्याचे दिसून येत आहे.