पुणे: शहरातील एका आयटी (IT) कर्मचाऱ्याला मद्य प्राशन करून मोटारसायकल चालविल्याप्रकरणी मोटार वाहन न्यायालयाने दोषी ठरवले. न्यायालयाने त्याला सात दिवसांचा साधा कारावास आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.विशेष म्हणजे, यापूर्वीही आरोपीला मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता.
न्यायाधीश अमृत बिराजदार यांनी निकाल देताना सांगितले की, ‘आरोपीने या शिक्षेतून धडा घेतला असता, तर त्याने परत असा गुन्हा केला नसता. आरोपीने वारंवार हा गुन्हा केला असून, त्याला केवळ दंड ठोठावून सोडता येणार नाही. आरोपीला कठोर शिक्षेची गरज आहे.’
मनमोहन बालेश्वर त्यागी (वय ४५, रा. पिंपळे सौदागर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, आरोपीने दंड भरल्यानंतर त्याची रवानगी येरवडा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली.
१२ डिसेंबर २०२४ रोजी वाकड (Wakad) परिसरात पिंपरी-चिंचवड वाहतूक पोलिस (Pimpri-Chinchwad Traffic Police) वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करत होते. दुपारी दोनच्या सुमारास आरोपी भूमकर चौकातून वाकड गावाच्या चौकाकडे जात असताना पोलिसांनी त्याची तपासणी केली. त्यावेळी, आरोपीने मद्य प्राशन केल्याचे आढळले. पोलिसांनी आरोपीवर मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ व १८५ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपीने सात फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर राहून आपला गुन्हा कबूल केला. (Pune News)
‘आपण कुटुंबातील एकमेव कमावते सदस्य आहोत आणि तुरुंगवासाची शिक्षा झाली, तर आयटी कंपनीतील नोकरी गमवावी लागेल व कुटुंब रस्त्यावर येईल,’ असे सांगून आरोपीने न्यायालयाकडे नरमाईची विनंती केली. मात्र, न्यायालयाने सांगितले की, ‘आरोपी यापूर्वी मद्याच्या नशेत वाहन चालविल्याबद्दल दोषी ठरला होता.
कायद्याचा हेतू विचारात घेतल्यास सार्वजनिक रस्ता वापरणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी अशा प्रकारच्या आरोपींना दंड ठोठावला जातो. मात्र, दंड ठोठावल्यानंतरही आरोपी धडा शिकला नाही. त्यामुळे त्याला कठोर शिक्षा मिळायला हवी, परंतु आरोपीच्या शिक्षेचा फटका त्याच्या कुटुंबीयांना बसू शकतो. त्यामुळे आरोपीची विनंती आणि समाजाचे कल्याण यात समतोल साधून शिक्षा सुनावण्याची गरज आहे.’