रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे प्रेमकवी पुरस्कराचे वितरण
पुणे : अभिव्यक्त होणे ही माणूसपणाची खूण आहे. आजच्या पोटार्थी जगात वावरत असताना सर्जनशीलतेसाठी एक विराम शांतता हवी असते. ही सर्जनशील शांतता आज हरवली आहे. अशा काळात आपल्याला लिहिते ठेवत अभिव्यक्ती जीवंत ठेवण्याची उर्मी कवयित्री अनिता माने यांच्या काव्यातून जाणवते, असे प्रतिपादन प्रसिद्ध लेखिका व कवयित्री प्रा. डॉ. वर्षा तोडमल यांनी केले.
रंगत-संगत प्रतिष्ठानच्या काव्य विभागातर्फे व्हॅलेंटाईन डेनिमित्त गुरुवारी (दि.13) प्रसिद्ध कवयित्री अनिता माने यांचा यंदाच्या प्रेमकवी पुरस्काराने सन्मान करण्यात आला. पुरस्काराचे वितरण डॉ. वर्षा तोडमल यांच्या हस्ते झाले. त्यावेळी त्या बोलत होत्या. पत्रकार भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर, कार्याध्यक्ष मैथिली आडकर मंचावर होते.
डॉ. तोडमल पुढे म्हणाल्या, माणसाच्या माणुसपणाचा आविष्कार, अभिव्यक्तीचा हुंकार काव्यातून झाला असावा, त्यामुळेच काव्य हा आदिम साहित्यप्रकार आहे. कवी या परंपरेवर कलम करीत नाविन्याची निर्मिती करीत असतो. ही प्रयोगशीलता, अभिव्यक्तीचा वेगळा प्रयत्न कवयित्री अनिता माने यांच्या काव्यातून जाणवतो. रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सांस्कृतिक उर्जा देण्याचे कार्य घडत आहे, हे एक जिंदादिल प्रतिष्ठान आहे, असेही त्या आवर्जून म्हणाल्या.
सत्काराला उत्तर देताना अनिता माने म्हणाल्या, प्रेमाची नाती वेगवेळी असतात. त्यांच्या परिभाषाही अनेक असतात. सुरुवातीला मी शब्दांच्या प्रेमात पडले आणि त्यातूनच कविता करू लागले. कवितेने मला खऱ्या अर्थाने जगायला शिकविले. ‘तूच दिले शब्दांचे अंगण’, ‘कोण जाणे कशासाठी’ अशा काव्य रचना त्यांनी या प्रसंगी सादर केल्या.
सुरुवातीस ॲड. प्रमोद आडकर यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, प्रत्येक नात्यात प्रेम असतेच. आपल्याला आयुष्य अनेक गोष्टी शिकवित असते. या आयुष्यात दुस्वास, भांडणे, रागराग करत बसण्यापेक्षा जग प्रेमाने जिंकावे, कारण प्रेमाने अनेक गोष्टी सुलभतेने साध्य होत असता.
परियच आणि मानपत्र वाचन वैजयंती आपटे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे यांनी केले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात आयोजित प्रेम कविसंमेलनात कांचन सावंत, डॉ. ज्योती रहाळकर, सुजित कदम, कविता क्षीरसागर, चंचल काळे, जयश्री श्रोत्रिय, केतकी देशपांडे, निरूपमा महाजन, विजय सातपुते, मनीषा सराफ, स्वप्नील पोरे, तनुजा चव्हाण, प्रभा सोनवणे यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन प्राजक्ता वेदपाठक यांनी केले