मुंबई-राजन साळवी यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदे हे आपले राजकीय गुरु असल्याचे राजन साळवी यांनी म्हंटले आहे. ठाणे येथील आनंद आश्रमात राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
रत्नागिरी जिल्ह्यातील माजी आमदार राजन साळवी यांनी पक्षातील उपनेते पदाचा कालच राजीनामा दिला होता. गेल्या अनेक दिवसांपासून राजन साळवी हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यांनी दिलेल्या उपनेते पदाच्या राजीनाम्यानंतर यावर आता शिक्कामोर्तब झाले होते.
राजन साळवी हे शिवसेनेचे विशेषतः मातोश्रीशी एकनिष्ठ नेते अशी त्यांची ओळख होती. मात्र, अलीकडच्या काळात विनायक राऊत यांच्याशी त्यांचा वाद झाला आणि उद्धव ठाकरे यांनी देखील विनायक राऊत यांचीच बाजू उचलून धरल्याने राजन साळवी यांचे मन दुखावले होते. यामुळेच त्यांनी आता ठाकरे गटाला रामराम करण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जाते.
राजन साळवी यांच्या उपनेते पदाच्या राजीनाम्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली होती. एकनाथ शिंदे म्हणाले की, जे पक्षात येतील त्यांचे स्वागतच आहे. कारण गेल्या अडीच वर्षांमध्ये बाळासाहेबांच्या, आनंद दिघेंच्या विचारांच्या शिवसेनेत आमदार, खासदार, नगरसेवक तसेच अनेक नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यांना बाळासाहेबांची शिवसेना पुढे न्यायची आहे, वाढवायची आहे. बाळासाहेबांच्या विचारांवर आम्ही सत्ता स्थापन केली. अडीच वर्षे आम्ही जे काम केले ते लोकांना माहीत आहे आणि म्हणून विश्वास लोक दाखवत आहेत कामावर, हे काम करणारे सरकार आहे घरी बसणारे नाही. हे रिजल्ट देणारे सरकार आहे फील्डमध्ये उतरून 24X7 काम करणारे सरकार आहे.
पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, माझ्या मुख्यमंत्री काळात एवढे निर्णय आम्ही घेतले, एवढे प्रकल्प आम्ही सुरू केले, कल्याणकारी योजना लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी, लाडका ज्येष्ठ असे अनेक निर्णय आम्ही घेतले. विकासाचा अजेंडा घेऊन जाणारे आमचे सरकार आणि शिवसेना आहे आणि म्हणून शिवसेनेत अनेक नेते येत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर अनेक आमदार शिंदे गटात गेले होते. यावेळी मोजके आमदारच उद्धव ठाकरे यांच्या बाजूने एकनिष्ठेने उभे होते, यात राजन साळवी यांचा समावेश होता. महाविकास आघाडीची सत्ता गेल्यावर राजन साळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईला देखील सामोरे जावे लागले होते. तरी देखील त्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडली नव्हती.