श्री. छ. शाहु कला मंदिर येथे रसिकांची मोठी गर्दी
सातारा- आजच्या आधुनिक युगात देखील ढोलकी फडाचा तमाशा लोकांचे रंजन आणि उद्बोधन घडवीत आहे ढोलकी हलगीची सलामी, गाणं, मुजरा, गवळण, रंगबाजी, फारसा, वग हा तमाशाचा अविष्कार आजही कायम आहे लोकसंस्कृतीमध्ये तमाशा सारख्या रंजनपर लोककलेचे महत्व आढळ ध्रुव पदासारखे आहे. असे मत लोककलेचे ज्येष्ठ अभ्यासक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश खांडगे यांनी सातारा येथील ढोलकी फडाच्या तमाशा महोत्सवात नोंदविले.
सातारा येथील श्री. छ.शाहु कला मंदिर येथे दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित “लोकसंस्कृतीमध्ये तमाशा कलेचे महत्व”या लोककला परिसंवादानिमित्ताने राज्य सरकारने चर्चा घडवून आणली.
सदर परिसंवाद लोककलेचे जेष्ठ अभ्यासक प्रा. डॉ. प्रकाश खांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी लोकसाहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, लोककलेचे मार्गदर्शक आणि मंत्रालयाचे जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र शासनाने बहुजनांच्या या कलेची दखल घेतली आणि त्यासाठी मला योगदान देता आले हे अभिमानाची गोष्ट आहे. लोककलावंतांचे सर्व्हेक्षण सरकारने तातडीने करावा. अन त्यांना कलावंत म्हणून ओळखपत्र दयावे . असे विचार ज्येष्ठ पत्रकार आणि लोककलेचे अभ्यासक मंत्रालयातील जेष्ठ पत्रकार खंडूराज गायकवाड यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त होत असताना ग्रामीण साहित्य, लोकसाहित्य आणि लोककला यांचे योगदान मराठी भाषेच्या जडणघडणीत नजरेआड करून चालणार नाही, असे मत तमाशा आणि लोककलेचे अभ्यासक प्रभाकर होवाळ यांनी व्यक्त केले.