महाराष्ट्रातून ३०० हून अधिक उद्योजकांचा सहभाग ; मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे आयोजन
पुणे : मराठा आंत्रप्रेन्युअर्स असोसिएशनतर्फे मराठा उद्योजकांचे ‘बिझनेस कार्निव्हल २.०’ चे आयोजन पुण्यातील हॉटेल शेरेटन ग्रँड येथे करण्यात आले होते. यामध्ये महाराष्ट्रातील ३०० हून अधिक उद्योजकांनी सहभाग घेतला. व्यवसाय हा समाजामध्ये अमूलाग्र बदल घडवू शकतो, यासाठी सगळ्यांनी एकत्र यायला हवे, ही धारणा ठेवून परिषदेचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमात यशस्वी व उल्लेखनीय कार्य केलेल्या उद्योजकांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अरुण निम्हण, भारती मुरकुटे, ऋतुजा मोरे, किशोर जगताप, गौरव मोरे, देवेंद्र कानवडे, रोहित माने, चैत्राली कोंढरे, रेश्मा थोपटे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमात ‘बिझनेस कार्निव्हल २.०’ च्या विषेशांकाचे प्रकाशन झाले.
बांधकाम, पायाभूत सुविधा, उत्पादन आणि शिक्षण व व्यावसायिक सेवा क्षेत्रातील दिग्गज सहभागी झाले होते. विविध क्षेत्रातील दिग्गज व नामवंत उद्योजकांना एकत्र आणून त्यांच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी. तसेच यातून देशांतर्गत व्यवसायवृद्धी व्हावी, हा यामागील उद्देश होता.
अरुण निम्हण म्हणाले, सन २०१४ साली या असोसिएशनची स्थापना झाली असून. देशाच्या विकासासाठी उद्योगांचा विकास होणे गरजेचे आहे, ही धारणा ठेवून हा एकत्रीकरणाचा प्रयत्न करण्यात आला आहे. मराठा समाजातील उद्योजकांनी इतर संस्थांसोबत संलग्न होत कशा प्रकारे व्यवसायवृद्धी करता येईल, हे पाहणे देखील गरजेचे आहे. व्यवसायात अनेक आव्हाने असून एकमेकांच्या सोबतीने पुढे जायला हवे, असेही त्यांनी सांगितले.