शिंदेसेनेचे आमदार व माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज याच्या अपूर्ण बँकॉक हवाई टूरची राज्यभर चर्चा आहे. खरे तर कुटुंबीयांना न सांगता, दोन मित्रांसह तो चार्टर्ड प्लेनने बँकॉकला निघाला होता. ही बाब खटकल्याने सावंत यांनी राजकीय प्रभावाचा उपयोग करून त्याला अर्ध्या वाटेतून परत आणले. त्यासाठी मुलाचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार पोलिसात दिली. या आधारे पोलिस यंत्रणा आमदार पुत्राला परत आणण्यासाठी राबली. केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही पदाचा वापर करत फोनाफोनी केल्याने ऋषिराजला घेऊन जाणारे विमान अंदमानपासूनच परतले.
एकदा विमान उड्डाण झाल्यानंतर त्याचे इमर्जन्सी लँडिंग करणे सोपे नसते. त्यासाठी काही तरी ठोस, सबळ कारण असावे लागते. त्यामुळे तानाजी सावंत यांनी आपल्या मुलाचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार दिली. पोलिसांनीही त्यांच्या या तक्रारीवर तातडीने हालचाली करून विमानतळ प्राधिकरणापर्यंत हा मेसेज पोहोचवला. केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हेही पुण्याचेच असल्याने सावंत यांनी त्यांची मदत घेतली. अपहरणाच्या तक्रारीचे कारण पुढे करून मोहोळ यांनीही आपल्या अधिकाराचा वापर करून तातडीने विमानाला परत बोलावले. जर फक्त बेपत्ता झाल्याची तक्रार दिली असती तर नियमानुसार इतक्या लवकर हालचाली करून विमान अर्ध्या प्रवासात परत बोलावता आले नसते. त्यामुळे सावंतांनी खोट्या तक्रारीचा बहाणा केला, अशी माहिती सूत्रांनी दिली.
विमानतळावर उतरल्यानंतर गुन्हे शाखेने ऋषिराज सावंत व त्याच्यासोबतचे दोन मित्र प्रवीण प्रदीप उपाध्याय आणि संदीप श्रीपती वासेकर यांचे जबाब नोंदवून घेतले. यात व्यावसायिक कामानिमित्त बँकॉकला तातडीने जात असल्याची माहिती ऋषिराज यांनी पोलिसांना दिली. मात्र, यामागे दुसरेच कारण असल्याचा पोलिसांना संशय आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडला असावा, अशीदेखील चर्चा आहे. पण सावंत कुटुंबीयांनी त्याचे खंडन केले. ऋषिराजने ९ फेब्रुवारी रोजी पैसे भरल्यानंतर कंपनीने डीजीसीएशी संपर्क साधून एअर ट्रॅफिक कंट्रोल यांच्याकडून हवाई वाहतुकीची परवानगी घेतली. एअर ट्राफिक कंट्रोलने दिलेल्या वेळेत व उंचीवर खासगी विमान बँकॉकच्या दिशेने सोमवारी दुपारी ४.३० वाजता रवाना झाले. मात्र, त्यानंतर तानाजी सावंत यांनी सिंहगड रोड पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली व विमान परत बोलावण्याच्या हालचाली सुरू झाल्या. पोलिसांनी विमानतळाशी संपर्क साधून पायलटशी तातडीने संपर्क करत हवेतूनच विमान पुन्हा पुण्याकडे वळण्याचे आदेश दिले. इमर्जन्सी परवानगीदेखील दिली.
ऋषिराज व त्याचे २ मित्र परतल्यानंतर पुणे विमानतळावर त्यांचे अर्धा तास जबाब नोंदवून घेतला. ऋषिराजने सांगितले, एक आठवड्यापूर्वीच तो चार्टर्ड विमानाने दुबईला गेला होता. त्यानंतर पुन्हा बँकॉकला जात असल्याचे कुटुंबीयांना समजल्यावर ते आपल्याला परवानगी देणार नाहीत, ओरडतील. त्यामुळे कुणालाही माहिती न देता परस्पर चार्टर्ड विमानाचे बुकिंग करून मित्रांसोबत गेल्याचे सांगितले. वडिलांचा लाडका मुलगा अचानक कुठेतरी निघून गेल्याने कुटुंबीयांचा गोंधळ उडाला व त्यांनी शोधाशोध सुरू केली. कारचालकाकडून त्यांना समजले की, मुलगा पुणे विमानतळावर गेला. त्यामुळे बँकॉकला जाणाऱ्या वेगवेगळ्या विमानांची माहिती घेतली. तेव्हा तो चार्टर्ड विमानाने गेल्याचे स्पष्ट झाले. पुणे पोलिसांनी आता संबंधित एव्हिएशन कंपनी यांच्याकडून या प्रवासाबाबत व इतर अधिकृत माहिती मागितली आहे.
ऋषिराज यांचा मोठा भाऊ गिरिराज सावंत यांनी सांगितले की, सोमवारी दुपारी ऋषिराजचा मोबाइल न लागल्याने सगळा गोंधळ उडाला. आम्ही पोलिसात तक्रार दिली व पोलिसांनी आम्हाला सहकार्य केले. घरात कुठलाही वाद झालेला नाही. आमच्या कुटुंबाच्या विषयात कुणीही राजकारण करू नये. पोलिसांकडून या घटनेचा पूर्ण तपास सुरू आहे.