मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे अनेक नेते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. काही पदाधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. तर आगामी काळात सहा खासदार देखील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच या खासदारांनी एकत्र पत्रकार परिषद घेत या वृत्ताला नकार दिला होता. मात्र एकनाथ शिंदे यांच्या सत्कार समारंभाला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी उपस्थिती लावल्याने याबाबतची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या वतीने आता ऑपरेशन टायगर राबवले जात असल्याची चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे यांचे पुत्र आमदार आदित्य ठाकरे हे दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. यादरम्यान त्यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची देखील भेट घेतली. तसेच ते आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांची देखील भेट घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या दरम्यान आदित्य ठाकरे हे सर्व खासदारांची एकत्रित बैठक घेणार आहेत. ठकारे गटाच्या खासदारांचा शिंदे गटात प्रवेशात होणार या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानले जात आहे.
काँग्रेस व शिवसेनेच्या ठाकरे गटातील अनेक नेते शिंदे गटात प्रवेश करणार आहेत, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी शिवसेनेचे मंत्री मंत्री उदय सामंत यांनी केला होता. यासंबंधीचे ऑपरेशन टायगर लवकरच टप्प्याटप्याने राबवण्यात येणार असल्याचे ते म्हणाले होते. त्यानंतर ही चर्चा सुरु झाली होती. या खासदारांनी एकत्र येत हे वृत्त फेटाळले देखील होते. मात्र, संजय दिना पाटील यांच्या शिंदेंच्या कार्यक्रमाच्या उपस्थितीवरुन ही चर्चा पुन्हा सुरु झाली. यात काही नावे प्रकाशात आली असून काही नावे अद्याप प्रकाशात आलेली नसल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
लोकसभा निवडणुकीमध्ये ठाकरे गटाला चांगले यश प्राप्त झाले आहे. मात्र, देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार स्थापन झाले. त्यामुळे पुढची पाच वर्षे सत्ताधारी पक्षात बसण्याची ठाकरे गटाच्या खासदारांची इच्छा आहे. मात्र, आता पक्ष फुटला तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. या कायद्यातून वाचायचे असेल तर सहा खासदारांचा आकडा महत्त्वाचा आहे. त्यामुळे सहा खासदारांचे मन वळवण्यात शिंदे गटाला यश आले असल्याचे बोलले जात आहे. या खासदारांच्या बाबतीत पडद्यामागची जुळवणी पूर्ण झाली असून लवकरच हे सहा खासदार शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी केलेल्या वक्तव्याकडे पाहिले जात आहे.