मुंबई-राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या गद्दाराचा केलेला सन्मान महाराष्ट्राच्या अस्मितेला लागलेला धक्का लावणारा असल्याची संतप्त टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. दिल्लीत होणारे साहित्य संमेलन हे दलाल व भ्रष्टाचाऱ्यांचे संमेलन असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. राऊत यांनी यावेळी थेट शरद पवारांवर टीका केल्यामुळे महाविकास आघाडीत बेबनाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शरद पवार यांनी मंगळवारी दिल्लीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सोहळ्यात शिवसेनेचे प्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मान केला. त्यांच्या या कृतीमुळे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत चांगलेच संतप्त झालेत. त्यांनी बुधवारी पत्रकारांशी संवाद साधताना या प्रकरणी शरद पवारांवर थेट निशाणा साधला. ते म्हणाले, राज्याचे राजकारण हे फार विचित्र दिशेने जात आहे. कोण कुणाला टोप्या घालत आहे आणि कोण कुणाच्या टोप्या उडवत आहे, कोण कुणाला गुगली टाकत आहे आणि कोण स्वतः हीट विकेट होत आहे हे पुन्हा एकदा समजून घ्यावे लागेल.
ज्या एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे सरकार पाडले, बेईमानी केली, त्यांच्या कार्यक्रमाला शरद पवारांनी जायला नको होते ही आमची भावना आहे. महाराष्ट्रातल्या लोकांपुढे आम्ही कोणत्या तोंडाने जाणार? राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो हे ठीक आहे. पण ज्याने महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांना आम्ही महाराष्ट्राचे शत्रू समजतो, त्यांच्याबरोबर जे लोक खुलेआमपणे जाऊन बसलेत, त्यांना अशा प्रकारचे सन्मान आपल्या हातून देणे हे महाराष्ट्राच्या अस्मितेला व स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे असे आम्हाला वाटते. कदाचित शरद पवारांची भावना वेगळी असेल. पण महाराष्ट्राच्या जनतेला हे काही पटले नाही.
शरद पवार ज्येष्ठ नेते आहेत. आम्ही त्यांचा आदर करतो. पण ज्यांनी बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, अमित शहांच्या सहकार्याने फोडली व महाराष्ट्र कमजोर केला, अशांना आपण सन्मानित करता, यामुळे मराठी माणसांच्या हृदयाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. आम्हाला तुमचे दिल्लीतले राजकारण माहिती नाही. आम्हालाही राजकारण कळते. पण काल जे काही झाले ते पाहून आम्हाला नक्कीच वेदना झाल्या आहेत. काही गोष्टी राजकारणात टाळायच्या असतात. तुमचे व अजित पवारांचे गुफ्तगू होत असेल. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न असेल. पण तरीही आम्ही अजित पवारांनी तुमचा पक्ष फोडला, तुमचे कुटुंब फोडले म्हणून याचे भान राखून आम्ही आमचे पाऊले टाकत असतो.
ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्याचे मोठे काम एकनाथ शिंदे यांनी केल्याचे कौतुक शरद पवारांनी केले आहे. पत्रकारांनी ही बाब संजय राऊत यांच्या निदर्शनास आणून दिली असता ते म्हणाले की, हे खोटे आहे. शरद पवारांकडे चुकीची माहिती आहे. ठाण्याचे राजकारण योग्य दिशेने नेण्याचे काम मागील 30 वर्षांत ठाकरेंच्या शिवसेनेने केले आहे. त्यांना माहिती नसेल तर सांगतो ठाण्याचा विकास हा सतीश प्रधान यांच्या काळात झाला. आज ठाण्यात जे काही दिसत आहे ते सर्वकाही बाळासाहेब ठाकरे यांच्या संकल्पना होत्या. सतीश प्रधान यांना विकासाची एक दृष्टी केली. त्यांनी टेंडरबाजी केली नाही. त्यानंतर शिवसेनेचे अनेक महापौर झाले. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या राजकारणात फार उशिरा आले. शरद पवारांना हे माहिती हवी असेल तर आम्ही आमचे ठाण्यातील प्रमुख कार्यकर्ते राजन विचारे त्यांच्याकडे माहिती देण्यासाठी पाठवू. एकनाथ शिंदे हे फार उशिरा आमदार झाले. विधानसभेत आले. त्यानंतर ठाण्याची वाट लागण्यास सुरुवात झाली.
मुंबईतील व्यावसायिक तथा शस्त्रास्त्र डीलर अभिषेक वर्मा यांनी नुकताच शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. संजय राऊत यांनी यावरूनही शरद पवार व एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. शरद पवारांनी काल शिंदेंचा सत्कार केला. त्यामुळे त्यांनीच त्याचे उत्तर दिले पाहिजे. तो ही महादजी शिंदे यांच्या नावाने सत्कार केला. शिंदेंचा पक्ष म्हणजे अमित शहांचा पक्ष आहे. त्यामुळे त्यांनीही त्याचे उत्तर दिले पाहिजे. त्यांना देशद्रोहाचा आरोप असणारे चालत आहेत. काल पवारांनी शिंदेंचा नव्हे तर महाराष्ट्राचे तुकडे पाडणाऱ्या, महाराष्ट्राचे उद्योगधंदे पळवून नेणाऱ्या अमित शहांचा सत्कार केला. आणि हे जे काही तुम्ही नावे घेत आहात, दलाल, भ्रष्टाचाऱ्यांचे, देशद्रोही आदींचे ते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत. त्यांच्या मुखियाचा सत्कार शरद पवार करत आहेत.देवेंद्र फडणवीस यांनी काल दलालांना धडा शिकवण्याचे विधान केले होते. पण आंतरराष्ट्रीय कीर्तीचे दलाल त्यांच्या पक्षात गेलेत. त्यामुळे त्यांनी याविषयी बोलू नये.
संजय राऊत यांनी यावेळी दिल्लीतील साहित्य संमेलनावरही टीका केली. ते म्हणाले, हा मुद्दा नाराजी व्यक्त करण्याचा नाही. या आमच्या पक्षाच्या भावना आहेत. दिल्ली सुरू असणारे साहित्य संमेलन हे साहित्य संमेलन नसून राजकीय दलाली आहे. तिथे दलालीच सुरू आहे. कुणालाही कसेही पुरस्कार देत आहेत, कुणाचाही कसाही सत्कार करत आहेत. या लोकांचा साहित्याशी संबंध काय? माझा आयोजकांना प्रश्न आहे, तुम्ही दिल्लीत दलाली करण्यासाठी आला आहात का? तुम्ही साहित्याची कोणती सेवा करत आहात? कोण करत आहे हे साहित्य संमेलन आयोजित? हा भाजपचा एक उपद्व्याप आहे. काय चालू आहे मराठीची सेवा? महाराष्ट्राच्या मानेवर पाय ठेवणाऱ्या लोकांचा इथे सत्कार केला जात आहे? कोण करत आहे हे सगळे? यांना महाराष्ट्र माफ करणार नाही. हे साहित्य संमेलन नसून, दिल्लीतील दलाली आहे. आम्ही या संमेलनाला जाणार नाही, असेही संजय राऊत यावेळी संतप्त सूरात म्हणाले.
ठाकरेंनी अजित पवारांचा सन्मान केला, पण आम्ही बोललो नाही – अमोल कोल्हे
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होतोय, याचा आनंद आहे. मात्र त्याला गालबोट लावण्यापेक्षा काही सूचना असतील तर सुचवाव्यात, अशा शब्दात शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी संजय राऊत यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी देखील अजित पवार यांचा सत्कार केला होता. त्यावेळी आमच्या पक्षातील कोणीही त्यावर आक्षेप घेतला नाही, अशी आठवणही त्यांनी या प्रकरणी ठाकरे गटाला करवून दिली आहे. महादजी शिंदे यांचे योगदान कोणीही नाकारू शकत नाही. मात्र पुरस्काराचे निकष काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मला त्या निकषांची कल्पना नाही. त्यामुळे त्यावर टीका करणे योग्य ठरणार नाही, असेही ते यावेळी म्हणाले.
पवारांवर टीका करण्याएवढे संजय राऊत मोठे झाले का? -शंभूराज देसाई
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनीही या प्रकरणी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांवर टीका करण्याएवढे राऊत मोठे झालेत का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे. ते म्हणाले, शरद पवारांवर टीका करण्याएवढे मोठे संजय राऊत झाले का? हेच राऊत आतापर्यंत म्हणायचे की शरद पवार यांच्यासारखा नेता महाराष्ट्राला भेटला हे राज्याचे भाग्य आहे. पण काल पवारांनी दिल्लीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा सत्कार केला आणि राऊत पवारांनाच त्यांनी काय करावे व काय करू नये हे सांगायला लागलेत.