पुणे/ नवी दिल्ली- महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्ती अभिमानाने ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ या ओळी गात असतो. त्याच ओळी सार्थ करण्याचे काम उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झालेले आहे. त्यांनी जम्मू-काश्मीर आणि पंजाब मध्ये उभारलेल्या महाराष्ट्र भवनसाठी पुढाकार घेतला. याव्यतिरिक्त देशाच्या पातळीवर महाराष्ट्राची प्रतिमा तयार केली. त्यामुळे महादेव शिंदे यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाची निवड केली असल्याचे सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या झालेल्या सत्कारामुळे संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर न देता त्यांनी संस्थेची भूमिका आणि सत्कार करण्यामागचे कारण स्पष्ट केले.
या संदर्भात माध्यमांशी बोलताना संजय नहार म्हणाले की, साहित्य महामंडळ ही एक स्वायत्त संस्था आहे. साहित्य महामंडळ ज्यांना संमेलन घेण्यासाठी देते, ती प्रत्येक वेळी एक वेगळी संस्था असते. यंदाचे संमेलन हे सरहद संस्थेने घेतले आहे. साहित्य संमेलनाच्या निमित्ताने संमेलन पूर्व सत्कार करणे ही परंपरा आहे. यामध्ये महादजी शिंदे यांचे नाव घेणे, या मागचे कारण देखील त्यांनी सांगितले. ‘दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे आपण महाराष्ट्र गीतामध्ये म्हणत असतो. हे दिल्लीचेही तख्त राखतो, ही कवी कल्पना ज्यांच्यामुळे आली तेच महादजी शिंदे आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाने आम्ही पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.
वास्तविक हा पुरस्कार लष्करी सेवेतील व्यक्तीला द्यायचा, असा निर्णय झाला होता. मात्र, महादजी शिंदे यांच्या विषयी आम्ही अभ्यास केला, त्या वेळी ते कवी मनाचे असल्याचे लक्ष्यात आले. ते ओव्या आणि अभंग लिहित होते. महाराष्ट्राची एक प्रतिमा त्यांनी दिल्लीत येऊन तयार केली. देशभर महाराष्ट्राची प्रतिमा तयार करण्याचे काम त्यांनी केले होते. त्यामुळे त्यांच्या नावाचा पुरस्कार हा एकनाथ शिंदे यांना देण्याचा आम्ही निर्णय घेतला. एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र सदन हे काश्मीरमध्ये आणि पंजाब मध्ये बांधण्यासाठी काम केले. त्या वेळी त्यांनी महाराष्ट्राची प्रतिमा दिल्लीत आणि देशपातळीवर तयार करण्याचे काम केले आहे. त्यानुसार आम्हाला एकनाथ शिंदे यांना पुरस्कार द्यावा असे वाटले असल्याचे नहार यांनी स्पष्ट केले.
वास्तविक महाराष्ट्रात कितीही काही झाले तरी दिल्लीमध्ये आपण एक असतो. दिवसभर भांडलो तरी दिल्लीतील व्यासपीठ मोठे आहे. या व्यासपीठ एवढे मोठे दुसरे व्यासपीठ नाही. आम्ही महाराष्ट्रातील सर्व एक आहोत, हे दिल्लीत दाखवत असतो. त्यामुळेच आम्ही कालचा कार्यक्रम दिल्लीत घेतला असल्याचे संजय नहार यांनी म्हटले आहे.
महादेव शिंदे हे पानिपतच्या काळात होते. मात्र एखाद्या माणसाचे कर्तृत्व त्याच्या पुढच्या पिढीतील एखाद्या माणसाने काय केले? यावरून काही ठरत नाही. राजस्थान, मध्य प्रदेश पासून दिल्ली पर्यंत महादजी शिंदे यांचा तळ होता. त्यामुळे त्यांचा ऐतिहासिक संदर्भ लक्षात घ्या. आताची लढाई राज्य मिळवणे म्हणजे तलवारीने नाही तर प्रेमाने जिंकावी अशी आहे. त्यासाठीच दिल्लीत पुन्हा एकदा संमेलन होत असल्याचे संजय नहार यांनी सांगितले
मराठी साहित्य संमेलनाचा इतिहास नीट वाचला तर यापेक्षाही गंभीर टीका साहित्य संमेलनावर झाली आहे. गोविंद तळवळकर यांनी भिक्षुकांचे संमेलन म्हटले होते. ती दुर्गाबाईंनी यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री असताना देखील त्यांना संमेलना येऊ दिले नव्हते. वादविवाद हे महाराष्ट्राच्या निकोप वाढीसाठी चांगले आहेत. 1878 साली महादेव गोविंद रानडे यांचीही अशीच कल्पना होती. आजही महाराष्ट्रात सर्वात गाजलेली वाद विवाद स्पर्धा ही महादेव रानडे यांच्या काळात झालेलीच आहे. त्यामुळे वाद विवादाने काही फरक पडत नाही. अशा प्रकारची टीका करण्याची परंपरा आहे. त्यामुळे संमेलन खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे असल्याचे सिद्ध होते, असे देखील नहार यांनी म्हटले आहे.
संजय राऊत हे आमचे चांगले मित्र आहेत. नुसतेच मित्र नाही तर त्यांच्या एका पुस्तकाची प्रस्तावना मी दिली आहे. त्यात ‘भारतीय असंतोषाचे मराठी प्रतीक’ असा उल्लेख मी केला आहे. बंडखोरी ही दिल्लीला आणि महाराष्ट्राला नेहमी आवडते. व्यक्ती म्हणून त्यांच्याबद्दल आमच्या मनात टोकाचा आदर आहे. त्यांना टीका करण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे देखील नहार यांनी म्हटले आहे.

