पुणे-शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांच्याविरोधात सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ही तक्रार दिली असून तानाजी सावंत यांच्यावर शासकीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप केला आहे. यामुळे तानाजी सावंत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तानाजी सावंत यांचा मुलगा पुण्यातून गायब झाल्यानंतर तयार झालेल्या अपहरण नाट्यावर पडदा पडला होता. तो बँकॉकसाठी चार्टर विमानाने निघाला असल्याची माहिती समोर आली होती. यानंतर तानाजी सावंत यांनी आपली राजकीय ताकद पणाला लावली. पोलिसांनी तपासची चक्रे फिरवल्यानंतर हे विमान 8 तासांत पुणे विमानतळावर परतले. तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषिराज यांच्यासोबत त्याचे दोन मित्र देखील होते. यादरम्यान ऋषीराज सावंत यांनी जवळपास 68 लाख रुपये खर्च केल्याचे समजते. यावरुन विरोधकांकडून तानाजी सावंतांसह सरकारवर टीकेची झोड उठली होती. आता ठाकरे गटाच्या वतीने तानाजी सावंतांवर गुन्हा दाखल करण्यातची मागणी करत सिंहगड पोलिसांना निवेदन दिले आहे.
तानाजी सावंत यांच्यावर सरकारी यंत्रणेचा गैरवापर केला आहे. त्यांनी प्रशासनाचा जो वेळ वाया घातला त्याबाबत त्यांच्यावर कारवाई करावी तसेच ज्यांनी पोलिस ठाण्यात अपहरणाची तक्रार दिली त्यांच्यावर देखील कारवाई करावी, या मागणीचे निवेदन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सिंहगड पोलिस ठाण्यात देण्यात आले. कुटुंबातील भांडणामुळे घरी कोणालाही न सांगता बँकॉकला जात असलेल्या मुलासाठी माजी मंत्री तानाजी सावंत यांनी सगळी पोलिस यंत्रणा व सरकारी यंत्रणा कामाला लावली, यासाठी झालेला सर्व खर्च त्यांच्याकडून वसूल करावा, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
संतोष देशमुख यांचा हत्येली आरोपी अजून सापडत नाही. मात्र आठ तासात तानाजी सावंत यांचा मुलगा कसा सापडतो? असा प्रश्न देखील शिवसैनिकांनी उपस्थित केला. निवेदन देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख गजानन थरकुडे, शहर प्रमुख संजय मोरे, शिवसेना नेते वसंत मोरे, रेखा कोंडे आदी उपस्थित होते.
तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरण नाट्यावर विरोधकांकडून टीका केली जात आहे. मुलगा घरातून भांडण करून निघून गेला अशा वेळी केवळ त्या मुलाला अडवायचे असल्याने सर्व पोलिस यंत्रणा कामाला लावणे गरजेचे होते का? असा प्रश्न ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला होता. आपण सत्तेत असल्याचा, आमदार असल्याचा, पैसा असल्याचा, या सर्व गोष्टीचा गैरवापर करत अपहरणाची खोटी केस दाखल करून घेतली आणि चेन्नईहून मुलाला परत आणले. गोरगरीब नागरिकांचा साधा तक्रार अर्ज देखील पोलिस ऐकून घ्यायला तयार होत नाहीत. अशावेळी धन्य ते मंत्री महोदय, धन्य ते पोलिस स्टेशन आणि धन्य ते सरकार, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
अवघ्या आठ तासांत तानाजी सावंत यांच्या मुलाचा शोध लावणाऱ्या पोलिस यंत्रणेसह, महायुती सरकारवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली. व्हीआयपीच्या मुलाबाबत पोलिसांनी जेवढी तत्परता दाखवली, तेवढी सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्याबाबत का दाखवली नाही, असा सवालही त्यांनी केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात आहे. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झालेत. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चारच्या सुमारास माहिती मिळाली की तानाजी सावंत यांच्या मुलाला कोणीतरी घेऊन केले आहे. ही माहिती मिळाल्यानंतर तात्काळ सर्व टीम ऍक्टिव्हेट झाली आहे. त्यानंतर तातडीने यांची माहिती मिळवणे सुरू झाली आहे. ते पुण्यावरून फ्लाईटमध्ये गेले आहेत आणि फ्लाईट आता कोणत्या देशाने चालले आहे याबाबत कन्फर्मेशन मिळवणे सुरू आहे. तसेच त्यांना परत आणण्यासाठी सर्व यंत्रणा लागली आहे. या संदर्भात किडनॅपिंगची एफआयआर दाखल करण्यात आली आहे.