पुणे-अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरून चांगलाच गदारोळ उठला असून राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात अनेक संघटनांनी आक्रमक भूमिका घेत तीव्र निषेध व्यक्त केला आहे. तसेच राहुल सोलापूरकर यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला असून यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी विधान केले होते. यामुळे आंबेडकरी अनुयायांनी देखील संताप व्यक्त केला आहे.
राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहे. तसेच त्यांच्या घरासमोर शिवभक्त तसेच आंबेडकरी अनुयायांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. यावेळी पोलिसांनी राहुल सोलापूरकर यांच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी या प्रकरणावर भूमिका स्पष्ट केली आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार म्हणाले, राहुल सोलापूरकर यांचे दोन्ही व्हिडिओ पुणे पोलिसांनी तपासले आहेत. या व्हिडिओमध्ये अजून तरी काही आक्षेपार्ह सापडले नाही. सध्या त्यांच्या घराच्या बाहेर पोलिस बंदोबस्त दिला आहे. कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून तो पोलीस बंदोबस्त आहे. गरज पडली तर राहुल सोलापूरकर यांना चौकशीसाठी बोलवून घेऊ. तसेच अजून तरी राहुल सोलापूरकर यांच्यावरती कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नाही, अशी माहिती अमितेशकुमार यांनी दिली.
दरम्यान, राज्यभरतून संताप व्यक्त होत असल्याचे पाहून अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी माफी देखील मागितली आहे. मात्र, त्यांनी माफी मागीतल्यानंतर त्यांचा आणखी एक व्हिडिओ समोर आला ज्यात त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण असल्याचे म्हंटले होते. यावरून आंबेडकरी अनुयायांनी संताप व्यक्त करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. यावरून पुन्हा एकदा राहुल सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे.
काय म्हणाले राहुल सोलापूरकर?
राहुल सोलापूरकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल एक चुकीचा शब्द गेला आणि शिवभक्तांची मी जाहीर माफी मागितली. लाच शब्द बोललो, मी अनेकांच्या भावना दुखावल्या त्याबद्दल माफी मागितली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल मी बोललेला असा एक व्हिडिओ समोर आला. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज यांच्याबद्दल मी अनेक व्याख्याने देत असतो, तरी हे का केलं जात आहे, याबद्दल मी अनभिज्ञ आहे. मी पुन्हा एकदा जाहीर माफी मागतो. महान व्यक्तीला कलुशीत करण्याचा प्रयत्न माझ्याकडून होणार नाही.