साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र प्रकर्षाने दिसत आहे- मुरलीधर मोहोळ
‘उजेडाचे प्रवासी’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि दिल्लीतील मराठीजणांचा सन्मान सोहळा
नवी दिल्ली :
राजधानी दिल्लीत राहून दिल्लीतील मराठी माणूस मनापासून मराठीपण जपत आहे, ही अभिमानाची बाब असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले. तर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने दिल्लीतील महाराष्ट्र प्रकर्षाने दिसत आहे, अशा भावना केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केल्या. सरहद, पुणे आयोजित अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ‘उजेडाचे प्रवासी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले आणि दिल्लीत विविध क्षेत्रात कार्यरत मराठी बांधवांचा सन्मान करण्यात आला. यावेळी मंत्री उदय सामंत आणि मुरलीधर मोहोळ बोलत होते.
राजधानी दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे. या साहित्य संमेलनापूर्वी विविध उपक्रमांची रेलचेल राजधानीत आहे. या उपक्रमांचा एक भाग म्हणून दिल्लीतील मराठी नागरिकांनी लिहिलेल्या ‘उजेडाचे प्रवासी’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. जीवन तळेगावकर यांनी या काव्यसंग्रहाचे संपादन केले आहे. तसेच विविध क्षेत्रात कार्यरत दिल्लीतील मराठी बांधवांचा सन्मान यावेळी करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, इंदिरा गांधी कला केंद्राचे सदस्य सचिव सच्चिदानंद जोशी, निवृत्त परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे, महेंद्र कुमार लड्डा, सरहदचे संजय नहार, जीवन तळेगावकर यावेळी मंचावर उपस्थित होते.
यावेळी बोलताना उदय सामंत म्हणाले की, साहित्य संमेलन दिल्लीत होत असून अधिकाधिक मराठी लोकांनी या साहित्य संमेलनाचा भाग व्हावा, दिल्लीतील मराठी लोक या साहित्य संमेलनाचे राजदूत असून साहित्य संमेलनामुळे उत्साहाचे वातावरण सर्वदूर पसरत असल्याच्या भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर होणारे साहित्य संमेलन विशेष असल्याचाही उल्लेखही सामंत यांनी यावेळी केला.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी दिल्लीत होणाऱ्या साहित्य संमेलनाचा भाग होता येत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर हे पहिलेच संमेलन आहे, त्यामुळे हे संमेलन विशेष आहे. दिल्लीत मराठी बांधवांचा सत्कार करताना दिल्लीतही महाराष्ट्र किती विस्तारला आहे, याची प्रचिती येते, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ साहित्यिक सदानंद मोरे, निवृत्त परराष्ट्र सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनीही याप्रसंगी समायोजित भाषणे केली.