पाणी पुरवठा अधिकाऱ्यांनी संपूर्ण भागाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे केले मान्य
पुणे-: वडगावशेरी मतदारसंघाला ३१ मार्च २०२६ पर्यंत टँकरमुक्त करून सर्व भागाला नळाद्वारे सुनियोजित व सुरळीत पाणी पुरवठा करणार, असा निर्धार आमदार बापुसाहेब पठारे यांनी केला आहे.
येरवडा क्षेत्रीय कार्यालय येथे बुधवारी (ता. १२) घेतलेल्या पाणी पुरवठा विभागासोबत घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते. सकाळी ७ च्या सुमारास पठारे यांनी पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. बैठकीदरम्यान, वडगावशेरी मतदारसंघातील पाणी पुरवठ्यासंदर्भातील प्रश्नांवर सखोल चर्चा झाली. गेल्या काही वर्षांपासून, नागरिकांना विस्कळीत पाणी पुरवठा होत असल्याने त्रास सहन करावा लागत आहे. पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाला घेऊन आमदार बापूसाहेब पठारे यांनी ठोस पाऊले उचलल्याचे दिसून येते. बैठकीत त्यांनी अधिकारी वर्गाला तातडीने कार्यवाही करण्याबाबतचे आदेश दिले आहेत.
पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी एका वर्षात संपूर्ण वडगावशेरी मतदारसंघाला सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन बैठकीदरम्यान दिले. तसेच, पोरवाल रस्ता परिसर, निंबाळकर नगर, साठे वस्ती, स्वामी समर्थ नगर या भागांना येत्या २५ फेब्रुवारी २०२५ पर्यंत, तर येत्या १५ मार्चपर्यंत डीवाय पाटील रस्ता परिसर, चिरके कॉलनी, पठारे वस्ती, आदर्श नगर, गणेश नगर, कर्मभूमी नगर, लेक व्ह्यू, खांदवे नगर यासह लोहगाव पूर्व भागाला पूर्ण क्षमतेने पाणी दिले जाईल. तसेच, २५ मे २०२५ पर्यंत धानोरी डोंगर परिसर, सहारा परिसर, न्याती बिल्डिंग परिसरात जलवाहिन्या टाकून नियमित पाणी देणार, असल्याचे शाखा अभियंता सुधीर आलुरकर यांनी स्पष्ट केले.
आमदार बापूसाहेब पठारे यांनी येरवडा, वडगावशेरीतील गलांडे नगर, विमाननगर यांसह पाणी टंचाई असणाऱ्या भागात देखील नियमित पाणी पुरवठा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. येत्या वर्षभरात पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या यांची कामे पूर्ण करून मतदारसंघातील सर्व भागात नियमित पाणी पुरवठा करा, अशा सूचना देखील केल्या.
येरवड्यात ४० वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या असल्याने अशुद्ध व दूषित पाणी पुरवठा होतो. त्यामुळे येरवड्यातील जलवाहिन्या बदलण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीदेखील आमदारांनी आयुक्त राजेंद्र भोसले यांच्याकडे फोनद्वारे केली. आयुक्तांनी देखील यावर सकरात्मक प्रतिसाद देत मागणी मान्य केली आहे.
बैठकीच्या निमित्ताने, यावेळी पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप, अधीक्षक अभियंता इंद्रभान रणदिवे, झोन १ चे उपायुक्त राजीव नंदकर, अधीक्षक प्रकल्प अभियंता श्रीकांत वायदंडे, कार्यकारी अभियंता एकनाथ गाडेकर, उप-अभियंता रविंद्र पाडळे, उप अभियंता चंद्रसेन टिळक, प्र. उप- अभियंता अन्वर मुल्ला, येरवडा क्षेत्रीय कार्यालय सहायक महापालिका आयुक्त वंदना साळवे, कार्यकारी अभियंता तुळशीराम नागटिळक, महेंद्र बहिरम, राजेंद्र खांदवे, संतोष आरडे, किशोर विटकर, संजय गलांडे, डॅनियल लांडगे, विशाल मलके, शैलेश राजगुरू, गणेश ढोकले आदि उपस्थित होते.
चौकट
“पाणी सोडणारे वॉलमॅन जर पैशाची मागणी करत असतील, तर नागरिकांनी मला अथवा पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी”, असेही आवाहन आमदार पठारे यांनी केले.