आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची माहिती
पुणे ता. 12 फेब्रुवारी
शिवाजीनगर येथे अत्याधुनिक एसटी बसस्थानक उभारण्यासाठी येत्या मे महिन्यात भूमिपूजन करण्यात येणार आहे, असे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी बुधवारी सांगितले. शिवाजीनगरला पूर्वीच्या जागेवर बसस्थानक बांधण्यासाठी एसटी महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यामध्ये येत्या आठवड्यात एम ओ यु करार होणार आहे . या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. तीन वर्षात बस स्थानक बांधण्यात येईल.
शिरोळे यांनी शिवाजीनगर बस स्थानक पूर्वीच्या जागी उभारण्यासाठी गेले वर्षभर पाठपुरावा केला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सोबत त्यांनी गेल्या महिन्यात पुण्यात बैठक घेतली. तेथे झालेल्या निर्णयाचा पाठपुरावा करीत शिरोळे यांनी सोमवारी पवार यांना निवेदन दिल्यानंतर, उपमुख्यमंत्री पवार यांच्या मंत्रालयातील दालनात संबंधित सर्व विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक आज बुधवारी सकाळी झाली. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक,राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे बैठकीला उपस्थित होते. त्यात याबाबतचे निर्णय घेण्यात आले.
शिरोळे बैठकीतील निर्णयाची माहिती देताना म्हणाले, ” वित्त, नियोजन, परिवहन, एसटी महामंडळ आणि महा मेट्रोचे वरिष्ठ अधिकारी बैठकीला उपस्थित होते. नागरिक व प्रवाशांच्या अपेक्षा मी बैठकीत मांडल्या. शिवाजीनगर एसटी बस स्थानकाच्या पूर्वीच्या जागी मेट्रोचे भुयारी स्थानक बांधण्यात आले आहे. तेथे वरील बाजूला अत्याधुनिक बसस्थानक उभारण्यासाठी एसटी महामंडळ आणि महा मेट्रो यांच्यात येत्या आठवड्यात एम ओ यु करार करण्याचा निर्णय घेण्यात आला. महा मेट्रो मार्फत पीपीपी तत्त्वावर हे बांधकाम करण्यात येईल. येत्या तीन आठवड्यात याबाबतच्या निविदा काढण्यात येतील. निविदा मंजूर करून मे महिन्यापर्यंत प्रत्यक्ष काम सुरू करण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले आहेत. त्यामुळे मे महिन्यात एसटी बसस्थानक उभारणीसाठी भूमिपूजन करण्यात येईल.
शिवाजीनगर एसटी बस स्थानक 2019 मध्ये पुणे मुंबई रस्त्यावर वाकडेवाडी येथे डेअरीच्या जागेत स्थलांतरित करण्यात आले आहे. ते पुन्हा मूळच्या जागेवर येईल. या ठिकाणी दिवसभरात सुमारे दोन हजार गाड्यांची ये-जा होते. मुख्यत्वे विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मुंबई या भागात जाणाऱ्या एसटीच्या गाड्या शिवाजीनगर बसस्थानकावरून जातात. त्यामुळे प्रवाशांची चांगली सोय होणार आहे. बस स्थानकाच्या सोबतच एसटी गाड्यांसाठी मोठे वर्कशॉप, गाड्या पार्किंग साठी जागा, पहिल्या मजल्यावरही गाड्या उभ्या करण्याची सोय करण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 600 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पीपीपी तत्त्वावर हा प्रकल्प तीन वर्षात उभारण्यात येईल, अशी माहिती शिरोळे यांनी दिली.