पुणे : कोणत्याही शारीरिक मर्यादा असल्या तरी प्रत्येक मुलाला व्यक्त होण्याचा हक्क आहे. या भावनेतून विशेष मुलांचा नृत्याविष्कार पुणेकरांनी अनुभवला. निमित्त होते अंतर्नाद आयोजित विशेष मुलांच्या नृत्यसादरीकरणाचे!
अंतर्नादतर्फे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या सभागृहात अंतर्नादच्या संचालिका, मानसोपचारतज्ज्ञ अश्विनी पाटील यांच्या पुढाकारातून डान्स ऑरा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डाउन सिंड्रोम, ऑटिझम आणि विशेष मुलांना नृत्याद्वारे नवी उमेद मिळावी या हेतूने अंतर्नादच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जातात.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. या नंतर देशभक्तीपर गीते तसेच प्रसिद्ध चित्रपट गीतांवर विशेष मुलांनी आत्मविश्वासने ठेका धरला. या नृत्याला उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे दाद दिली. आपले मूल मंचावर आत्मविश्वासाने नृत्य सादर करताना पाहून पालकांचे डोळे पाणावले. विशेष मुलांबरोबरच त्यांचे पालक, थेरपिस्ट आणि समन्वयक देखील या नृत्य सादरीकरणात उत्साहाने सहभागी झाले.
विशेष मुलांना मार्गदर्शन करणे पुरेसे नाही, तर या मुलांसाठी विविध उपक्रम आयोजित करणे गरजेचे असते. नृत्य हा त्यातील एक विशेष प्रकार. कार्यक्रमाचे आयोजन करताना सराव सत्रे, योग्य मंचाची निवड, वेशभूषा तसेच इतर व्यवस्था यासाठी योग्य ते नियोजन करावे लागते. जेव्हा ही मुले मंचावर आत्मविश्वासाने नृत्य सादर करतात, तेव्हा ती समाजाच्या दृष्टीकोनाला नवा आयाम देतात, असे अश्विनी पाटील यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंदा वझे आणि आदिती कुलकर्णी यांनी केले.