पुणे – कवयित्री दीपाली दातार यांचा ‘तळ्यातले आकाश’ हा कवितासंग्रह म्हणजे त्यांचा अमृतानुभव आहे, असे मत ज्येष्ठ कवी, लेखक हेमकिरण पत्की यांनी व्यक्त केले. कवितालेखन केवळ स्वतः पुरते नसते. स्वतःसहित सर्वांनाच कविता उजळवत असते, हा अनुभव दातार यांच्या कविता देतात, असेही ते म्हणाले.
सृजनसंवाद प्रकाशनाच्या वतीने कवयित्री, लेखिका दीपाली दातार यांच्या ‘तळ्यातले आकाश’ या कवितासंग्रहाचा प्रकाशन समारंभ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी पत्की बोलत होते. याप्रसंगी कवयित्री दीपाली दातार, ज्येष्ठ कवयित्री, लेखिका अंजली कुलकर्णी आणि प्रकाशक गीतेश शिंदे, मुकुंद दातार, अनिरुद्ध दडके आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
हेमकिरण पत्की म्हणाले,“शीर्षकापासूनच हा कवितासंग्रह वैशिष्ट्यपूर्ण आहे. कवयित्रीची सत्य, सौंदर्य आणि शिवत्वाची ओढ या कवितांमधून व्यक्त झाली आहे. कवयित्रीचे भावोत्कट स्फुरण संवेदनशीलपणे इथे प्रकट झाले आहे”.
अंजली कुलकर्णी म्हणाल्या, “कवयित्री दीपाली यांच्या आत्मशोधाची ही कविता आहे. जीवनजाणिवांचा, स्त्रीपणाचा, मानवी नातेसंबंधांचा, निसर्गाच्या रूपांचा आणि आत्मरूपाचा शोध घेण्याचा ध्यास या कविता व्यक्त करतात. हा शोध दीपाली यांची कविता सजगतेने, प्रगल्भतेने आणि तीव्रोत्कट पद्धतीने घेताना दिसते”.
मनोगत मांडताना दीपाली दातार म्हणाल्या, “हा माझा पहिलाच कवितासंग्रह आहे. माझ्या भाववृत्ती आणि जगणं यांची एकात्म अभिव्यक्ती कवितांमधून अभिव्यक्त झाली असावी. आध्यात्मिक धारणांचे आशयसूत्र असून, निसर्ग संवेदन, संवादाची ओढ यातून कलात्मक विकसनाला अवकाश मिळतो का, हे शोधण्याचा एक प्रयत्न आहे”.
प्रकाशक गीतेश शिंदे यांनी कलाकारांचे, लेखक, कवींचे सृजन रसिकांपर्यंत नेण्यामधील दुवा म्हणून काम करत असल्याचा उल्लेख केला. सर्जनशीलतेला कोंदण देण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असे ते म्हणाले.
कार्यक्रमाला उपस्थित राहू न शकलेल्या ज्येष्ठ लेखिका प्रतिभा रानडे यांचे मनोगत वाचून दाखवण्यात आले.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात दीपाली दातार यांच्या ‘तळ्यातले आकाश’ या कवितासंग्रहातील निवडक कवितांचे अभिवाचन अनिरुद्ध दडके, संजय गोखले आणि वृषाली पटवर्धन यांनी केले. श्रुती विश्वकर्मा मराठे यांनी काही कवितांचे गायन केले. व्हायोलीनची साथ अनुप कुलथे यांनी केली. अनिरुद्ध दडके यांनी सूत्रसंचालन केले. मुकुंद दातार यांनी स्वागत केले.