पुणे : येथील शिवाजीनगर बसस्थानकाच्या बांधकामाचा आढावा घेण्यासाठी उपमुख्य मंत्री अजित पवार यांनी उद्या (बुधवारी) सकाळी मंत्रालयात बैठक बोलावली आहे, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
ही बैठक उपमुख्य मंत्री अजित पवार यांच्या दालनात होणार असून, या बैठकीला आमदार शिरोळे यांच्यासह वित्त, परिवहन, नगरविकास खात्याचे सचिव, वरिष्ठ अधिकारी, महामेट्रो, पुणे चे व्यवस्थापकीय संचालक उपस्थित रहाणार आहेत.
महामेट्रो च्या कामासाठी शिवाजीनगर एसटी स्थानक शासकीय दूध डेअरीच्या शेजारी हलविण्यात आले. महामेट्रोचे काम आता पूर्ण झाले आहे. त्याचप्रमाणे प्रवाशांची गैरसोयही आता टाळली जायला हवी, याकरिता लवकरात लवकर शिवाजीनगर बसस्थानक मूळ जागी उभे रहावे, यासाठी आमदार शिरोळे यांनी उपमुख्य मंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांची नुकतीच भेट घेऊन, या कामात त्यांनी लक्ष घालावे, अशी विनंती केली होती. मंत्रालयात संबंधित खात्यांचे सचिव आणि अधिकारी यांची बैठक घेऊ, असे आश्वासन पवार यांनी दिले होते. त्यानुसार ही बैठक होणार असल्याचे शिरोळे यांनी सांगितले.

