पुणे-ऋषीराज सावंत अपहरण नाट्यावरुन,’हा वैयक्तिक आणि कौटुंबिक विषय आहे. विरोधकांनी राजकारण राजकारणाच्या पद्धतीने चालावे. कोणावरही अशी वेळ येऊ नये मात्र येऊ शकते, याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. यावर कोणत्याही चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न पत्रकार बांधव किंवा राजकारण्यांनी करु नये, असे आवाहन ऋषीराजचा मोठा भाऊ गिरीराज तानाजी सावंत यांनी केले आहे. या प्रकरणावर पडदा टाकायला हवा, असे देखील गिरीराज सावंत यांनी म्हटले आहे.
वडिलांच्या भीतीपोटी ऋषीराज सावंत याने बँकॉकच्या दौऱ्याविषयी सांगितले नाही, अशा शब्दात शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मोठा मुलगा गिरीराज सावंत यांनी अपहरण नाट्यासंदर्भातील सर्व हकिगत सांगितली. आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही. एक आई – वडील म्हणून सर्वांनाच मुले असतील. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले. त्यामुळे आता या प्रकरणावर पडदा टाकायला हवा, असे देखील गिरीराज सावंत यांनी म्हटले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत यांचे अपहरण झाल्याचा दावा केला जात होता. ऋषिकेश सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झाले होते. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केल्याचे सांगितले जात होते. पुणे पोलिसांनी घटना स्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला होता. पोलिसांनी तपासाची सुत्रे फिरवल्यानंतर अखेर ऋषीराज सावंत बँकॉकला जात असल्याचे समोर आले. या सर्व घटनेत पोलिस यंत्रणेचा वापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर गिरीराज सावंत यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
या संदर्भात एका वृत्त वाहिनीशी बोलताना तानाजी सावंत यांचे मोठे सुपुत्र आणि ऋषीराज सावंत यांचे मोठे बंधू गिरीराज सावंत म्हणाले की, दोनच दिवसापूर्वी ऋषीराज हा दुबई दौरा कडून आला होता. त्यामुळे लगेचच बँकॉकला कशाला जातो? असा प्रश्न कुटुंबाकडून उपस्थित होईल. वडिल लगेचच आपल्याला जाऊ देणार नाही. आणि बँकाँकला जाणेही महत्त्वाचे होते. त्यामुळे तो कोणालाही न सांगता मित्रांसोबत बँकॉकला चालला होता. आमच्या कुटुंबात कोणताही वाद नाही. एक आई – वडील म्हणून सर्वांनाच मुले असतील. त्यामुळे या प्रकरणात कोणीही राजकारण करू नका, असे आवाहन देखील त्यांनी केले.

