मुंबई-शिवसेना शिंदे गटाचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या मुलाला परत आणण्यासाठी पोलिस खाते कामाला लागले होते. चार तासानंतर त्याला हवेतून माघारी आणण्यासाठी यंत्रणांना यश आले. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला 60 दिवस उलटूनही या प्रकरणातील एका आरोपी कृष्णा आंधळे फरारच आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहखात्यावर हल्ला चढवला आहे. तानाजी सावंतांच्या मुलासाठी सरकारने रान पेटवले. अशाच पद्धतीने गृहखात्याने मन लावून काम केले, तर कृष्णा आंधळे गजाआड होईल, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्या आज दिल्ली येथे माध्यमांशी बोलत होत्या.
सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील गृहखाते आणि पोलिस किती तत्पर आहेत याचे उदाहरण काल पहायला मिळाले. सत्ताधारी पक्षाचे आमदार आणि माजी मंत्रीमहोदय तानाजी सावंत यांच्या मुलाचे विमान हवेतल्या हवेत परत बोलावून राज्यातील यंत्रणेने आपली कुशलता सिद्ध केली. परंतु, याच यंत्रणेला मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे हा साठ दिवसांपासून सापडत नाही, ही बाब पटण्यासारखी नाही.
सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, कालच्या घटनेत वरपासून खालपर्यंत यंत्रणा हलली आणि सदर नेत्याच्या पुत्राचे विमान हवेतल्या हवेत परत फिरले. अशाच पद्धतीने गृहखात्याने मन लावून काम केले, तर कृष्णा आंधळे गजाआड होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अतिविशिष्ट लोकांच्या किरकोळ घरगुती कामांसाठी मनापासून झटणारे गृहखाते सर्वसामान्य माणसांना न्याय मिळवून देण्यासाठी अशीच तत्परता का दाखवत नाही हा खरा प्रश्न आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. तानाजी सावंत यांच्या मुलासाठी या सरकारने काल रान पेटवले होते. पण 60 दिवस उलटूनही कृष्णा आंधळे सापडत नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे, असेही त्या म्हणाल्या.
दरम्यान, महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादक शेतकरी शासनाच्या वेळकाढूपणा मुळे अडचणीत सापडला आहे. राज्यातील ‘नाफेड’च्या माध्यमातून सोयाबीन खरेदी केला जात आहे. यासाठी नोंदणी करुनही अनेक शेतकऱ्यांचा सोयाबीन खरेदी करण्यात आलेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ आणि योग्य खरेदी मूल्य देण्याची आवश्यकता असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
राज्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीन शिल्लक असून मुदतवाढ मिळाली नाही तर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. शेतकऱ्यांचा हा आवाज शासनाच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी महा विकास आघाडीच्या खासदारांनी संसद भवन परिसरात निदर्शने करुन घोषणा दिल्या असल्याचे सुळे यांनी सांगितले. शासनाने याची दखल घेऊन तातडीने सोयाबीन खरेदीला मुदतवाढ आता योग्य तो भाव द्यावा, अशी मागणी या वेळी करण्यात आली. या आंदोलनात खासदार ओमराजे निंबाळकर, निलेश लंके, प्रणिती शिंदे, वर्षा गायकवाड, विशाल पाटील, प्रतिभा धानोरकर, कल्याण काळे, प्रशांत पडोळे, बळवंत वानखेडे, शिवाजी काळगे उपस्थित होते.

