नवी दिल्ली: पुणे-नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी सोडवण्याच्या दृष्टीने ‘हयात हॉटेल विमाननगर ते शिरूर’ उन्नत पूल प्रस्तावित करण्यात आला होता. परंतु, सध्या पूलाची लांबी कमी करण्याबाबत चर्चेला उधाण आले आहे. ज्यात शहरी भागातील चार किलोमीटर वर्दळ असलेल्या भाग कमी करण्यात आल्याचे समजते. यावर वडगावशेरी मतदारसंघाचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली.
भेटीदरम्यान, प्रस्तावित असणाऱ्या उन्नत पुलाची लांबी कमी न करता पुर्वी प्रस्तावित असलेला ‘हयात हॉटेल विमाननगर ते शिरूर’ कायम ठेवण्याबाबतचे निवेदन पठारे यांनी दिले. यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले, की “विमाननगर ते खांदवे नगर यामध्ये काही प्रमुख चौक अत्यंत वर्दळीचे आहेत. सोबतच, खराडी व वाघोली या भागात आयटी कंपन्या, शाळा-महाविद्यालये, निवासी प्रकल्प तसेच बैठी घरे यांमुळे नागरीकरण वाढले आहे. विमाननगर सीटीआर कंपनी समोरील चौक, टाटा गार्ड रूम, खराडी बायपास, इऑन आयटी पार्ककडे जाणारा जनक बाबा दर्गा येथील चौक, खराडी जकात नाका चौक या प्रमुख चौकांत रोज वाहतूक कोंडी होत आहे. पुलाच्या कमी केलेल्या लांबीमुळे वाहतूक कोंडीचा त्रास आहे तसाच राहील आणि भविष्यात या प्रश्नाची दाहकता अधिक वाढेल.”
सदर पूल पूर्वी प्रस्तावित केल्याप्रमाणे झाल्यास एकूणच पुणे-नगर रस्त्यावरील वाहतुकीचा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी निवेदनात नुमद केले आहे. प्रस्तावित पुलाची लांबी कमी का करण्यात आली, हे कारण अद्यापही स्पष्ट करण्यात आले नाही. नवी दिल्ली येथील लोकसभा सचिवालय येथे संसदीय अभ्यासवर्गाला गेले असताना आमदार बापूसाहेब पठारे यांनी वाहतुक मंत्री गडकरी यांची भेट घेतली.
निवदेनाद्वारे केलेल्या संबंधित मागणीवर नितीनजी गडकरी साहेब यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल त्यांचे मनपुर्वक आभार व्यक्त करतो. ‘एमएसआयडीसीचे व्यवस्थापकीय संचालक दिक्षीत यांनी सदर रस्ता पुणे महानगरपालिकेने एमएसआयडीसीला हस्तांरीत केल्यास हयात हॅाटेल विमाननगर ते खराडी जकात नाका येथील पुलाची लांबी कमी न करता प्रस्तावित केलेला पूल साकारला जाऊ शकतो.
-बापूसाहेब पठारे (आमदार, वडगावशेरी विधानसभा)

