पुणे-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे बडे नेते तथा माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत हे पुणे विमानतळ परिसरातून बेपत्ता झालेत. त्यांचे पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीतून आलेल्या 4 जणांनी अपहरण केल्याचे सांगितले जात आहे. पुणे पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर घटनेचा तपास सुरू केला आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मुलगा ऋषीराज सावंत मुलाचे अपहरण झाल्याचा निनावी फोन पुणे पोलिसांच्या कंट्रोल रुमला आला. त्यानंतर पोलिसांची एकच धावपळ सुरू झाली. पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या 4 अज्ञात व्यक्तींनी सिंहगड पोलिस स्टेशनच्या हद्दीतील नऱ्हे परिसरातून सायंकाळी 4.57 मिनिटांनी त्यांचे अपहरण केल्याची माहिती आहे. पोलिस या प्रकरणी ऋषिकेश सावंत यांचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहत आहेत. तसेच या प्रकरणी कथित अपहरण झालेल्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजही तपासले जात आहे.
कौटुंबिक वादानंतर बेपत्ता झाल्याचा दावा– ‘एका वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, ऋषीराज सावंत हे कौटुंबिक वादानंतर दुपारी 4.15 च्या सुमारास घरातून निघून गेल्याचा दावा केला जात आहे. या वृत्तानुसार, ऋषिकेश सावंत यांचा आज आपल्या कुटुंबातील सदस्यांशी वाद झाला. त्यानंतर ते चार्टर फ्लाईटने बँकॉकला निघून गेले. ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी संबंधित विमान कंपनीशी संपर्क साधून माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. बँकॉकला जाणारे हे चार्टर विमान भारताच्या हद्दीत असेल तर त्याला भारतातच उतरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचीही माहिती आहे. तूर्त सिंहगड पोलिस ठाण्यात या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.