कारागृहातील बंद्याकरिता ई-मुलाखात सुविधा
पुणे- महाराष्ट्र राज्यातील कारागृहांमध्ये बंदीस्त असलेल्या भारतीय व विदेशी बंद्यांना त्यांच्या
कुटुंबियांशी व वकिलांशी संवाद साधण्यासाठी ePrisons या प्रणाली अंतर्गत e-Mulakat सुविधा दिनांक
04 जुलै 2023 पासुन सर्व कारागृहांत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. यापूर्वी मुलाखात नाव
नोंदणीसाठी नातेवाईकांना खूप दूरवरुन प्रवास करत येवून कारागृहाबाहेर तासन्-तास वाट पाहत बसावे
लागत असल्याने बंद्यांच्या नातेवाईकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असे. परंतु आता
बंद्यांसोबत मुलाखात घेण्याकरीता बंद्यांचे नातेवाईक काहीदिवस अगोदरच ePrisons (ICJS)
प्रणालीद्वारे नोंदणी करतात व त्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छित दिवशी व वेळी बंद्यांची मुलाखत घेता येते.
राज्यातील विविध कारागृहांमध्ये विविध देशातील नागरिक विदेशी बंदी म्हणुन दाखल असून
त्यांचे परदेशातील मुले / मुली व नातेवाईकांशी ई-मुलाखत / व्हीडीओ कॉन्फरसद्वारे विहीत अटीवर
सदरील सुविधा लागू करण्यात आलेली आहे. राज्यातील कारागृहांमध्ये सुमारे 1105 पेक्षा अधिक विदेशी
बंदी असून अनेक दिवसांपासून किंवा वर्षांपासून त्यांचा आपले कुटुंबिय, आई-वडील, मुले-मुली यांच्याशी
संपर्क होऊ शकलेला नव्हता. परंतु e-Mulakat सुविधा सुरु झाल्यामुळे विदेशी बंद्यांचा त्यांच्या
कुटुंबियांशी संवाद होऊ लागला असून त्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक बदल दिसून येऊ लागले आहेत.
अनेक वर्षांनंतर आपल्या कुटुंबियांशी ई-मुलाखतीद्वारे संवाद साधतांना विदेशी बंद्यांच्या चेहऱ्यावर
समाधानाची भावना दिसून येत आहे.
दिनांक 01 जानेवारी 2024 दिनांक 09 फेब्रुवारी 2025 या कालावधीमध्ये सुमारे 3,16,647 ई-
मुलाखती झालेल्या आहेत. सदर कालावधीमध्ये येरवडा मध्यवर्ती कारागृह 45,174, तळोजा मध्यवर्ती
कारागृह-43,848, ठाणे मध्यवर्ती कारागृह-36,371, मुंबई मध्यवर्ती कारागृह-29,347, नागपूर मध्यवर्ती
कारागृह-31,444, कल्याण जिल्हा कारागृहा-22,608, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह- 23,860 इतक्या
ई-मुलाखती झालेल्या आहेत. राज्यातील उर्वरित कारागृहांमधील ई-मुलाखत सुविधेचा लाभ घेणाऱ्या
बंद्यांची संख्या देखील लक्षणिय आहे.
बंद्यांना e-Mulakat सुविधेचा लाभ देण्यासाठी अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक,
कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे दिनांक 22 मार्च 2024 रोजीचे परिपत्रक निर्गमित केले
असून त्यानुसार न्यायाधीन बंद्यांना महिन्यातुन चार वेळा व शिक्षाधीन बंद्यांना दोन वेळा नातेवाईक, मित्र
व वकीलांसोबत नियमांचे अधीन राहुन e-Mulakat देण्यात येत आहे. बंद्यांना e-Mulakat सुविधा
देण्यासंबंधीच्या मार्गदर्शक सुचना सदर परिपत्रकात असून त्यानुसारच सदरची सुविधा बंद्यांना पुरविण्यात
येत आहे.
बंद्यांना सदरची सुविधा उपलब्ध करुन दिल्यामुळे जास्तीत जास्त बंद्यांच्या नातेवाईकांचा e-
Mulakat सुविधा वापरण्याकडे कल दिसून येत आहे व त्यामुळे बंद्यांच्या कुटुंबियांच्या प्रत्यक्ष
मुलाखतीसाठी येण्याच्या खर्चात देखील बचत झालेली आहे. सदरील सुविधेच्या अंमलबजावणीबाबत
प्रशांत बुरडे (भा.पो.से.) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक, कारागृह व सुधारसेवा,
महाराष्ट्र राज्य, पुणे व डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से.), विशेष पोलीस महानिरीक्षक (मुख्यालय),
कारागृह व सुधारसेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचेकडून वेळोवेळी मार्गदर्शन होत असून सदरची सुविधा
चांगल्या प्रकारे बंद्यांना उपलब्ध करुन देण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.
सदरील सुविधा लागू झाल्याची माहिती बंद्यांच्या नातेवाईकांना मिळण्याकरीता सर्व कारागृहांच्या
दर्शनी भागांमध्ये नातेवाईकांची गर्दी असणाऱ्या ठिकाणी माहिती फलक लावण्यात आलेले आहेत. तसेच
नातेवाईक भेटीच्या ठिकाणी बंद्यांच्या नातेवाईक/वकील यांना NPIP पोर्टलवर मुलाखत नोंदणी कशी
करावी, याचे प्रात्यक्षिक LED Screen वर Video Clip द्वारे दाखवण्यात येत आहे. परिणामी, बंद्यांच्या
नातेवाईकांना ई-मुलाखत अधिक सुलभ झाल्यामुळे बंदी व नातेवाईकांमध्ये समाधानाची भावना दिसून
येत आहे. ई-मुलाखतीस बंद्यांचे नातेवाईकांना चांगला प्रतिसाद देण्यात सुरुवात केलेली असून सदरील बाब
कारागृह विभागाची आधुनिकतेकडे वाटचाल सुरु असल्याचे सुतोवाच करणारी आहे.