नागपूर – दिल्ली येथे २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत होऊ घातेलल्या ९८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अभिजात गिताचे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी कौतुक केले.या संमेलन गिताचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. ‘आम्ही असू अभिजात’ असे या गीताचे शब्द आहेत.नागपूर येथे झालेल्या या छोटेखानी सोहळ्याला संगीतकार आनंदी विकास, विकास देशमुख, अनिल मुळजकर, आदित्य विकास, योगेश कदम यांची उपस्थिती होती.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे संमेलन देशाच्या राजधानीत ७० वर्षांनी होत आहे. या संमेलनाचे यजमानपद पुण्यातील सरहद संस्था भूषवित आहे. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. तारा भवाळकर संमेलनाध्यक्ष आहेत. संमेलनाच्या निमित्ताने डॉ. अमोल देवळेकर यांनी लिहिलेले ‘आम्ही असू अभिजात’ हे संमेलन गीत संगीतकार आनंदी विकास यांनी संगीतबद्ध केले आहे.
हरिहरन, शंकर महादेवन यांचे स्वर
संमेलन गिताला सुप्रसिद्ध गायक-संगीतकार शंकर महादेवन आणि हरिहरन यांच्यासह मंगेश बोरगावकर, सागर जाधव, शमिमा अख्तार यांचे स्वर लाभले आहेत. ना. श्री. गडकरी यांनी संमेलन गिताचे कौतुक केले. तसेच शंकर महादेवन व हरिहरन यांच्यासारख्या दिग्गज गायकांच्या स्वरांमुळे खऱ्या अर्थाने अभिजात निर्मिती झाली असल्याचे गौरवोद्गारही काढले.

