मुंबई- राजकारणातील चर्चा केवळ माध्यमांमध्ये सुरू असते. माझी आणि राज ठाकरे यांची राजकीय भेट नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरे यांनी मला फोन करून अभिनंदन केले होते. त्याचवेळी मी घरी येईल, असे मी त्यांना सांगितले होते. त्याचप्रमाणे मी आज त्यांच्या घरी गेलो. तसेच त्यांच्याच घरी ब्रेकफास्ट केला आणि आमच्यात गप्पा झाल्या. आमच्या बैठकीमध्ये किंवा चर्चेचा कोणताही राजकीय संदर्भ नाही. केवळ आमच्यातील मैत्रीसाठी मी त्यांच्या घरी गेलो होतो, असे देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर महायुतीमध्ये मनसेचा समावेश होणार का? याबाबत प्रश्न विचारले जात आहेत. इतकेच नाही तर अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करणार असल्याची चर्चा देखील सुरू झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.आमच्यातील मैत्रीसाठी आपण राज ठाकरे यांची भेट घेतली असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.