मुंबई-छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा:एकदा पोहे खा, पाहून घ्या असे एकदा झाले, दोनदा झाले. एकदा काय ते शुभमंगल करून टाका, असा सल्ला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि मनसेला दिला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाल्यावर विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देताना दिला आहे. फडणवीस सकाळी अचानक राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. यावेळी दोघांमध्ये सुमारे तासभर चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. मात्र, विरोधकांकडून या भेटीवर टीका केली जात आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी तिथे नाष्टाही केला. या दोघांच्या भेटीचे राजकीय वर्तुळात विविध अर्थ काढले जात आहेत. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही नेत्यांची भेट झाल्यामुळे तिला मोठे महत्त्व आहे. या पार्श्वभूमीवर विजय वडेट्टीवार यांनी टीका केली आहे.
एकदा पोहे खा, पाहून घ्या असे एकदा झाले, दोनदा झाले. एकदा काय ते शुभमंगल करून टाका, असा सल्ला विजय वडेट्टीवार यांनी भाजप आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला दिला. चर्चांवर चर्चा होण्यापेक्षा देऊन घेऊन मोकळे होणे परवडले, असा आमचा त्यांना सल्ला असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. छुपके छुपके प्यार कितने दिन चलेगा? जरा खुलके आओ, लोगों को भी पता चलेगा, तुम्हारे प्यार में कितना दम है, असा टोला विजय वडेट्टीवार यांनी लगावला. महानगर पालिकेचे लग्न सुखरूप पार पाडण्यासाठी या बालकाचा उपयोग होईल तेवढा करावा, अशी इच्छा असावी, अशी टीका भाजपवर केली.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणूक निकालानंतर राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करत सत्ताधारी महायुतीचा समाचार घेतला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस हे राज यांच्या भेटीसाठी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या. या भेटीत फडणवीस यांनी राज ठाकरेंसोबत राजकीय घडामोडींबद्दल चर्चा करत काही प्रस्ताव ठेवल्याची माहिती आहे. यामध्ये राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांच्या राजकीय पुनर्वसनाचाही समावेश असल्याचे समजते.

