मुंबई-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. फडणवीस सकाळी अचानक राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदार करण्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे. मात्र, फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. राज ठाकरे यांनी शिवाजी पार्क परिसरात ‘कॅफे’ उघडला असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2025/02/GjZta-_a8AAMtu7-1024x682.jpg)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या शिवतीर्थवर जात राज ठाकरे यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे एक तास चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. आधी सर्वांसमोर आणि नंतर बंद दाराआड दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. मात्र, या दोघांत नेमकी काय चर्चा झाली? याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. मात्र विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांची पुत्र अमित ठाकरे यांचा पराभव झाला होता. त्यामुळे त्यांना राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेमध्ये घेण्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
![](https://mymarathi.net/wp-content/uploads/2025/02/476427422_1156511695844431_2539502040740148923_n-1024x683.jpg)
आगामी काळात मुंबई महानगरपालिका सह राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीमध्ये समावेश होईल, अशी चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देखील या दोन्ही नेत्यांच्या भेटीकडे पाहिले जात आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राज ठाकरे यांचा महाराष्ट्र निर्माण सेना हा पक्ष महायुती सोबत आल्यास मुंबईला महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवणे सहज शक्य होईल. यासाठीच या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.